सातारा जिल्हाहोम

बापूजी साळुंखे महाविद्यालयात बी.जे. प्रवेश प्रक्रिया सुरू

१५ जुलैला प्रवेश परीक्षा; शिवाजी विद्यापीठ संलग्न एकमेव केंद्र 

कराड/प्रतिनिधी : – 

पत्रकारिता क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या पदवीधरांसाठी कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाने सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ संलग्न पत्रकारिता पदवी (Bachelor of Journalism – B.J.) या एक वर्षीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात पत्रकारिता पदवीचा हा अभ्यासक्रम चालविणारे हे एकमेव महाविद्यालय असून, शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा या संस्थेने कायम राखली आहे. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत सातत्याने अव्वल स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे महाविद्यालयाने पत्रकारिता शिक्षणात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पत्रकारिता, प्रसारमाध्यमे, जनसंपर्क, डिजिटल मीडिया तसेच विविध संवाद माध्यमांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. याशिवाय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या पदवीधरांसाठीही हा अभ्यासक्रम प्रभावी ‘बी प्लॅन’ म्हणून उपयुक्त मानला जातो. लेखन, संवादकौशल्य, चालू घडामोडींचे ज्ञान आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठीही या अभ्यासक्रमाचा मोठा लाभ होतो.

कला, वाणिज्य, विज्ञान किंवा इतर कोणत्याही विद्याशाखेची पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. इच्छुक पदवीधरांनी प्रवेश प्रक्रियेची संधी न दवडता आवश्यक कागदपत्रांसह महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे यांनी केले आहे.

Related Articles