सह्याद्रिचे सभासद ज्ञानयाग प्रशिक्षणासाठी रवाना

कराड/प्रतिनिधी : –
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना आधुनिक ऊस शेतीचे तंत्र आत्मसात करता यावे आणि ऊस उत्पादनात गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने पुणे येथील व्हीएसआय (Vasantdada Sugar Institute) मध्ये आयोजित ‘ज्ञानयाग’ प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सभासदांचा अभ्यासदौरा रवाना करण्यात आला.
राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री तथा सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणादरम्यान आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन, संतुलित खतांचा वापर, रोग व कीड नियंत्रण, तसेच साखर उद्योगातील नव्या घडामोडींवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन सभासदांना मिळणार आहे.
या प्रशिक्षणातून मिळणारे ज्ञान प्रत्यक्ष शेतात वापरून ऊस उत्पादनाची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढविणे, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब करण्यासाठी सभासदांना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.
प्रशिक्षणासाठी शंकर कृष्णा कदम (गमेवाडी), अनिल निवृत्ती जाधव, पोपट जगन्नाथ जाधव (पाडळी हे.), भरत संपत माने (कालगाव), दीपक चंद्रकांत शेटे (इंदोली), संजय भानुदास जाधव (तासवडे), महादेव तुकाराम जाधव, सचिन भाऊसाहेब चव्हाण (चिखली), धनाजी गणपत गायकवाड (वाठार की.), केशव लक्ष्मण निकम (जयपूर), प्रसाद दाजी पवार (बेलवडे हवेली) आणि अभिषेक पाटील (पुसेसावळी) यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी चीफ अकाउंटंट जयेंद्र नाईक, जनरल मॅनेजर (केन) सुजय पवार, डेप्युटी चीफ अकाउंटंट भास्कर कुंभार, पुरवठा अधिकारी बटोळे, शेती अधिकारी वसंतराव चव्हाण, ऊस विकास अधिकारी संजय चव्हाण, ॲग्री ओव्हरसिअर सुरज घार्गे, डॉ. पवार, हिंदुराव यादव, संग्राम यादव यांच्यासह कारखान्याचे सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



