कृष्णा कारखान्याचे सभासद शेतकरी ज्ञानयाग प्रशिक्षणासाठी रवाना
कराड/प्रतिनिधी : –
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ४२ शेतकरी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे येथे आयोजित ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचे प्रतिएकरी उत्पादनवाढीसाठी शेतकर्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटतर्फे दरवर्षी प्रशिक्षण दिले जाते. या शिबीरात सहभागी होण्याची संधी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने कार्यक्षेत्रातील ४२ शेतकर्यांना उपलब्ध करून दिली आहे.
यावेळी नवनिर्वाचित संचालक लिंबाजी पाटील, धोंडीराम जाधव, बाबासो शिंदे, संभाजीराव पाटील, जे.डी.मोरे, अविनाश खरात, बाजीराव थोरात, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, आदींसह सेक्रेटरी सिद्धेश्वर शिलवंत, फायनान्स मॅनेजर राजाराम चन्ने, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, परचेस ऑफिसर विक्रमसिंह माने, पर्यावरण अधिकारी सुयोग खानविलकर यांच्यासह सर्व अधिकारी, सर्कल ऑफिसर, शेती मदतनीस व कर्मचारी उपस्थित होते.
या चार दिवसीय प्रशिक्षण शिबीरात राज्यातील हजारो शेतकरी सहभागी होत असतात. शिबीरात ऊस शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली वापर, माती परीक्षण, अधिक ऊस उत्पादनासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थापन, ऊती संवर्धित रोपे, बियाणे मळा, रोग व कीड नियंत्रण व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.



