आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्र

रामकृष्ण वेताळ यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांची केवायसी च्या समस्येतून मुक्ती. राज्यभरातील शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण

 

कराड/प्रतिनिधी –

शासकीय लाभाच्या योजना शेतकऱ्यांना मिळण्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा म्हणजे केवायसी करणे होय? अनेक शेतकऱ्यांना या केवायसी करताना प्रचंड हाल अपेष्ठांना तोंड द्यावे लागत आहे.सरकारी कचेरात हेलपाटे घालून जोडे झिजवावे लागत होते. अधिकारी वर्गाच्या पिळवणुकीलाही तोंड द्यावे लागत होते.तरीही केवायसी न झाल्याने लाभाच्या योजनेपासून वंचित राहावे लागत होते. ही समस्या लक्षात घेऊन रामकृष्ण वेताळ यांनी कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून शासकीय पातळीवरूनच केवायसी करून घेण्याचा मार्ग मोकळा केला आणि शेतकऱ्यांची या समस्येतून कायमची सुटका केली.यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व राज्य सरकारकडून नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजना राबवल्या जातात.या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा होतो. केंद्र सरकारचे वार्षिक 6000 व राज्याचे पुढील काळात बारा हजार रुपये वार्षिक जमा होणार आहेत. ही रक्कम जमा करून घेण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते केवायसी केलेले असावे ही अट आहे. म्हणजे बँक खात्याशी आधार कार्ड,पॅन कार्ड व मोबाईल नंबर संलग्न असला पाहिजे.
अनेक शेतकऱ्यांच्या या गोष्टी बँक खात्याशी संलग्न नसतात यामुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. लाभाच्या योजनेपासून वंचित राहावे लागते. ही गोष्ट भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.या समस्येतून कायमचा मार्ग काढण्यासाठी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेतली.शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी बाबत त्यांना निवेदन सादर केले. त्याचबरोबर या अडचणी सोडवण्यासाठी कोणती उपाययोजना करता येईल यासाठी चर्चा केली. हे काम प्रशासकीय पातळीवरून झाल्यास शेतकऱ्यांना केवायसी समस्येपासून मुक्ती मिळेल हे पटवून दिले. त्यांनीही लगेच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन शेतकऱ्यांच्या केवायसी संबंधाच्या अडचणी प्रशासनामार्फत सोडवण्यात याव्यात अशा सूचना केल्या. तसेच गावनिहाय याद्यांचे वाचन करून त्यातील त्रुटी दूर करण्याबाबत सूचना केल्या. यामुळे त्रुटी विरहित याद्या तहसीलदारांच्या मार्फत बँकांना देण्यात येणार आहेत.याचा परिणाम आपोआपच आधार कार्ड,पॅन कार्ड, भ्रमणध्वनी क्रमांक हा विनासायास संलग्न होऊन शेतकऱ्यांची केवायसी ची समस्या कायमची निकाली निघणार आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कृषीमंत्र्यांचे असे आदेश निघाल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतकऱ्यांचे प्रशासकीय कार्यालयातील खेटे यामुळे कमी होणार आहेत.प्रशासकीय पातळीवरील पिळवणूक संपून सन्मानाने लाभाच्या योजनाही त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणार आहे.ही समस्या सोडवून शेतकऱ्यांना लाभाच्या योजना मिळवण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्गातून रामकृष्ण वेताळ यांना धन्यवाद दिले जात आहेत. संपूर्ण राज्यात हा प्रश्न प्रथम शासन दरबारी मांडून त्याची सोडवणूक करून घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले जात आहे.

 

केंद्र व राज्य शासनाचा सन्माननिधी आता खात्यावर येणार.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची वार्षिक सहा हजार रुपये आणि पुढील काळात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे राज्य शासनाच्या वतीने वार्षिक 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी येत असलेल्या केवायसी च्या अडचणी आता प्रशासकीय पातळीवरून सोडवल्या जाणार असल्याने शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचा लाभ मिळणार आहे व त्यांची जीवनमान उंचावणार आहे.
कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना केवायसी प्रश्न संदर्भात रामकृष्ण वेताळ यांनी निवेदन दिले

Related Articles