कराड – मलकापूरच्या प्रश्नांसाठी विधानसभेत मध्यरात्री घुमला आ.डॉ. अतुलबाबांचा आवाज
भुयारी गटार योजना, रेड लाईन व ब्ल्यू लाईनसह विमानतळ विस्ताराबाबत जोरदार मांडणी

कराड/प्रतिनिधी : –
कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराड व मलकापूर शहरांच्या विकासासाठी, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत मध्यरात्री १२ वाजून १९ मिनिटांनी ठाम भूमिका मांडत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले. विरोधी पक्षाच्या २९३ अन्वयेच्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी मलकापूर शहरातील भुयारी गटार योजनेचा विस्तार, सांडपाणी व्यवस्थापन, झोपडपट्टी पुनर्विकास, तसेच कराड शहरातील पूररेषा निश्चिती, रेड लाईन व ब्ल्यू लाईनचा प्रश्न आणि कराड विमानतळ विस्तारासंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न सभागृहात उपस्थित करुन, मंत्री व सभापतींचे लक्ष वेधून घेतले.
राज्य सरकार मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या महानगरांची पायाभूत सुविधा सक्षम करत असताना, त्याच वेगाने दुसऱ्या व तिसऱ्या स्तरातील शहरांचा विकास करण्याची गरज व्यक्त करत, आमदार डॉ. भोसले यांनी कराड व मलकापूर शहरांना पश्चिम महाराष्ट्रातील प्रगत शहर म्हणून विकसित करण्याचा संकल्प व्यक्त केला.
आ.डॉ. भोसले म्हणाले, मलकापूर शहरात २०१४ मध्ये भुयारी गटार योजना राबवण्यात आली. त्यावेळी शहराची लोकसंख्या सुमारे ३० हजार होती. मात्र आता ती ५० हजारांहून अधिक झाली असून, वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर २८ किलोमीटरच्या नवीन आणि आधुनिक भुयारी गटार योजनेची गरज निर्माण झाली आहे. यासोबत संपूर्ण शहराचे जी.आय.एस. मॅपिंग करून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली उभारणे आवश्यक आहे. त्यानुसार स्काडा सिस्टिमचा वापर करत, सौरऊर्जेवर चालणारा आधुनिक एस.टी.पी. प्रकल्प उभारण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा.
मलकापूर शहरात सध्या सुमारे ३५० झोपडपट्ट्या असून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एकही झोपडपट्टी शिल्लक राहू नये हा आमचा उद्देश असून, यासाठी ६.५ हेक्टर जागेवर सुमारे ४०० कुटुंबांसाठी पक्क्या घरांची पुनर्विकास योजना सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.
कराड शहरातील प्रश्नांची मांडणी करताना आ.डॉ. भोसले म्हणाले, कराड शहर हे कृष्णा आणि कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर वसले असून, शहरासाठी पूर्वी निश्चित करण्यात आलेल्या रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन पूरमर्यादेमुळे शहराच्या विकासावर मर्यादा येत आहेत. जुन्या बांधकामांचा पुनर्विकास, नवीन प्रकल्प उभारणी आणि शहरी विस्तार या सर्वांमध्ये ही अट मोठा अडथळा ठरत आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वतंत्र सर्वेक्षण करून रेड लाईन व ब्ल्यू लाईनची पुनर्निश्चिती करण्यासाठी जलसंपदा आणि नगरविकास विभागाची संयुक्त बैठक घेण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली.
दरम्यान, कराड विमानतळाच्या विस्ताराचे काम सुरू असून ५००० फूट लांबीची नवीन धावपट्टी तयार केली जात आहे. यामुळे मध्यम आकाराची जेट विमाने उतरू शकतील. मात्र या परिसरातील विकासकामांनाही काही तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने यावरही शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आ.डॉ. भोसले यांनी केली.
आ.डॉ. अतुलबाबांच्या कार्यशैलीचे लोकांमधून कौतुक
पावसाळी अधिवेशनादरम्यान आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विधानसभेत मध्यरात्री उशिरापर्यंत उपस्थित राहून, कराड आणि मलकापूर शहराशी संबंधित विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या अडचणी प्रभावीपणे सभागृहात मांडल्या. आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी पुन्हा एकदा आपली कार्यशैली अधोरेखित केली असून, याबद्दल लोकांमधून त्यांचे कौतुक केले जात आहे.
एकाच दिवसात तिसऱ्यांदा बोलण्याची संधी
पहिल्यांदाच आमदार झालेल्या डॉ. अतुलबाबा भोसले यांनी संसदीय आयुधांचा खुबीने वापर करत, सोमवारी (ता. २९) एकाच दिवसात तब्बल तीनवेळा विधानसभेत बोलण्याची संधी पटकाविली. विधानसभा कामकाजाच्या दुपारच्या सत्रात १ वाजून १५ मिनिटांनी लक्षवेधी मांडताना त्यांनी कराडच्या रेड लाईन – ब्ल्यू लाईन पुनर्निश्चितीची मागणी केली. त्यानंतर सायंकालीन सत्रात ६ वाजून ५० मिनीटांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना, ए. आय.द्वारे ऊस उत्पादनवाढीसाठी शासनाने राज्यात प्रायोगिक प्रकल्प राबविण्याची आग्रही मागणी केली. त्यानंतर मध्यरात्री १२ वाजून १९ मिनिटांनी मलकापूर व कराड शहराच्या प्रश्नांसंबंधी आवाज उठवत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रगत शहर म्हणून आम्हाला कराड आणि मलकापूरची ओळख निर्माण करायची आहे. नागरिकांना आधुनिक सुविधा, चांगली पायाभूत व्यवस्था आणि झोपडपट्टीमुक्त शहर देण्यासाठी आम्ही दिवसरात्र काम करत आहोत. जनतेचे प्रश्न सोडविणे हीच माझी प्राथमिकता असून, सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी मंत्र्यांनीही सकारात्मकता दर्शविली आहे.
– आ. डॉ. अतुलबाबा भोसले



