सातारा जिल्हाहोम

टीईटी पेपरफुटीप्रकरणी काँग्रेसचे कराडमध्ये सरकारविरोधात आंदोलन

कराड/प्रतिनिधी : – 

टीईटी प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी कराडमध्ये राज्य व केंद्र सरकारविरोधात जोरदार निषेध आंदोलन करत भाजप सरकारवर तीव्र टीका केली. प्रश्नपत्रिका फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला असून, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून संबंधित जबाबदार मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

शिवतीर्थ दत्त चौक येथे सातारा जिल्हा युवक काँग्रेस, सातारा जिल्हा एनएसयूआय आणि सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश सरचिटणीस भूषण अनवटी आणि जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी टीईटी प्रश्नपत्रिका फुटीचा निषेध करत सरकारच्या परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नीट परीक्षेतील गैरप्रकारानंतर आता टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिकाही फुटल्याने विद्यार्थ्यांचा परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत झाला असल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षा केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळत असेल, तर ही प्रशासनाच्या अपयशाची कबुली असल्याचा आरोप त्यांनी केला.

पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या परिश्रमावर पाणी फेरले जात असून, पालकांनी केलेल्या कष्टांचाही अवमान होत आहे. अशा घटनांमुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांनी, विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास करूनही एका पेपरफुटीमुळे त्यांचे भविष्य धोक्यात येत असल्याची खंत व्यक्त केली. अशा घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य अंधारात ढकलले जात असून, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता धोक्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारचे धोरण केवळ फोडाफोडीचे असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारवर राजकीय टीका करत आमदार-खासदार फोडण्याच्या राजकारणाचाही उल्लेख केला. पेपरफुटीमागील सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाच्या अनुषंगाने हे आंदोलन करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाते, त्याचप्रमाणे पक्षांतर करणाऱ्या आमदार-खासदारांचीही नव्याने निवडणूक यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्री, तसेच राज्यातील तत्कालीन शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अन्यथा काँग्रेसचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

Related Articles