सातारा जिल्हाहोम

विद्याताई वेताळ यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

कराड/प्रतिनिधी : –

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानांतर्गत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांसाठी आयोजित लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मसूर (ता. कराड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद सदस्या विद्याताई वेताळ यांच्या हस्ते बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजून करण्यात आला.

यावेळी विद्याताई वेताळ यांनी लसीकरण केंद्राला भेट देत मोहिमेच्या अंमलबजावणीची पाहणी केली. त्यांनी उपस्थित आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून लसीकरण मोहिमेची माहिती घेत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. “पोलिओमुक्त भारताचे स्वप्न कायम राखण्यासाठी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पल्स पोलिओचे दोन थेंब देणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतेही बालक या लसीकरणापासून वंचित राहू नये. पालकांनी जबाबदारीने आपल्या पाल्यांना लसीकरण केंद्रावर आणून आरोग्य विभागाला सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या प्रसंगी डॉ. मिरजे, डॉ. बादल, सुपरवायझर श्री. वेल्हाळ, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.

राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाच्या माध्यमातून शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष नियोजन करण्यात आले असून, एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी सर्व स्तरांवर प्रभावी उपाययोजना करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Related Articles