अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जासाठी पतसंस्थांचाही पर्याय!
आ. डॉ. अतुल भोसले यांच्या पाठपुराव्यानंतर मंत्रालयात उच्चस्तरीय चर्चा

कराड/प्रतिनिधी : –
मराठा समाजातील तरुण उद्योजकांना उद्योग-व्यवसायासाठी आवश्यक अर्थसहाय्य अधिक जलद आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्जवाटप प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. बँकांसोबतच शासनाच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या पात्र व सक्षम पतसंस्थांमार्फतही कर्ज वितरण आणि व्याज परताव्याची प्रक्रिया राबविण्याचा पर्याय शासनस्तरावर विचाराधीन असल्याचे संकेत मिळाले आहेत.
कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मंत्रालयात सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीत कर्जवाटप अधिक गतिमान, पारदर्शक आणि सर्वसामान्य उद्योजकांसाठी सुलभ करण्याच्या दृष्टीने विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीत आ. डॉ. अतुल भोसले यांनी ग्रामीण भागातील उद्योजकांना बँकांमार्फत कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणींचा मुद्दा मांडत, सक्षम पतसंस्थांनाही या योजनेत सहभागी करून घेतल्यास अर्थसहाय्य अधिक वेगाने उपलब्ध होईल, असे मत व्यक्त केले. त्यामुळे उद्योग उभारणीला चालना मिळून रोजगारनिर्मितीलाही गती मिळेल, असे त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना, मराठा समाजातील तरुणांना उद्योग-व्यवसायासाठी सहज आणि वेळेत आर्थिक मदत मिळावी, यासाठी आवश्यक धोरणात्मक बदल करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगितले. यावेळी कर्ज मंजुरीची प्रक्रिया, व्याज परतावा, निधी वितरणातील विलंब तसेच उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींचाही आढावा घेण्यात आला.
बैठकीस अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सक्षम आणि पात्र पतसंस्थांमार्फतही अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अर्थसहाय्य सुरू झाल्यास राज्यातील हजारो तरुण उद्योजकांना कमी कालावधीत कर्ज उपलब्ध होईल. उद्योगांना गती मिळून रोजगारनिर्मितीलाही मोठी चालना मिळेल.
– आ. डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला.

