सातारा जिल्हाहोम

सातारा जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करा – खा. विशाल पाटील 

नामदेवराव पाटील यांना जिल्हाध्यक्षपदी निवडीबद्धल दिल्या शुभेच्छा, मोहनराव कदम यांचेही आशीर्वाद 

कराड/प्रतिनिधी : –

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नामदेवराव पाटील यांनी काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देत सातारा जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्यासाठी प्रभावी नेतृत्व करण्याचा विश्वास व्यक्त केला.

त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी विधानपरिषद सदस्य मोहनरावदादा कदम यांनीही नामदेवराव पाटील यांना आशीर्वाद देत संघटन विस्तारासाठी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा सल्ला दिला. या भेटीदरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील चिखलीकर, मुकेश मोहिते, अबरार आदी उपस्थित होते.

यावेळी सातारा जिल्ह्यातील काँग्रेसच्या आगामी वाटचालीबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी खासदार विशाल पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाचा विशेष गौरव करत सातारा जिल्ह्याला त्यांच्यासारखे अभ्यासू, स्वच्छ प्रतिमेचे आणि दूरदृष्टीचे नेतृत्व लाभणे, ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. प्रशासकीय अनुभव, विकासदृष्टी आणि प्रामाणिक नेतृत्वामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्हाध्यक्ष म्हणून तुमच्यावर केवळ संघटना वाढविण्याचीच नव्हे, तर काँग्रेसची विचारधारा, मूल्ये आणि जनहिताची भूमिका अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आहे. पक्षाने देश आणि राज्याच्या विकासासाठी दिलेले ऐतिहासिक योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असेही खा. पाटील यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या विकासासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय, राबविलेली विकासकामे आणि त्यामागील दूरदृष्टी समाजापुढे मांडणे, ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

बैठकीत सातारा जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, बूथस्तरावरील संघटना सक्षम करणे, कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संवाद वाढविणे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढविण्यासाठी समन्वयाने काम करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

यानंतर नामदेवराव पाटील यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी विधानपरिषद सदस्य मोहनरावदादा कदम यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. मोहनराव कदम यांनी त्यांचे अभिनंदन करत सातारा जिल्ह्यातील काँग्रेस संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रभावीपणे काम करण्याचा सल्ला दिला. नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Related Articles