सातारा जिल्हाहोम

सातारा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला अखेर पूर्णवेळ अधिकारी

प्रशांत कदम यांच्या पाठपुराव्याला यश; ले. कर्नल भीमसेन चवदार यांनी स्वीकारला पदभार

कराड/प्रतिनिधी : –

सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय आणि त्यांच्या वारसांना दिलासा देणारी महत्त्वाची घडामोड घडली असून, अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदावर अखेर पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. ले. कर्नल भीमसेन चवदार यांनी सोमवारी (दि. ६) रोजी सातारा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.

शूरवीर सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यात हे महत्त्वाचे पद दीर्घकाळ रिक्त असल्याने विविध शासकीय कामांसाठी माजी सैनिक, शहीदांचे कुटुंबीय आणि त्यांच्या वारसांना वारंवार कार्यालयीन अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर सैनिक फेडरेशन माजी सैनिक संघटना, सातारा यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.

संघटनेचे पदाधिकारी प्रशांत कदम यांनी दि. २८ जून रोजी पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे झालेल्या राज्यस्तरीय माजी सैनिक मेळाव्यात सैनिक कल्याण संचालक कर्नल दीपक ठोंगे यांच्याकडे ही मागणी ठामपणे मांडली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत राज्याचे माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई आणि सैनिक कल्याण संचालनालयाच्या प्रयत्नांतून ले. कर्नल भीमसेन चवदार यांची सातारा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील माजी सैनिक आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांची प्रलंबित कामे अधिक गतिमान होण्यास मदत होणार असून, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, सैनिक फेडरेशन माजी सैनिक संघटना, सातारा यांच्या वतीने माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई, सैनिक कल्याण संचालक कर्नल दीपक ठोंगे तसेच नवनियुक्त जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल भीमसेन चवदार यांचे अभिनंदन करत आभार व्यक्त करण्यात आले.

Related Articles