कराड उत्तरच्या प्रत्येक गावापर्यंत पाणी पोहोचवणार – आमदार मनोज घोरपडे
विधानसभेत व्यक्त केला निर्धार; मंत्री विखे-पाटील यांचे सकारात्मक निर्णयाचे आश्वासन

कराड/प्रतिनिधी : –
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील पाणीटंचाईचा प्रश्न विधानसभेत जोरदारपणे मांडत आमदार मनोज घोरपडे यांनी वंचित गावांना तातडीने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. लक्षवेधी सूचनेद्वारे त्यांनी पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संबंधित गावांचे तातडीने सर्वेक्षण करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
सभागृहात बोलताना आमदार घोरपडे यांनी, कोरेगाव तालुक्यातील अंभेरी, साप, वेळू, बेलवाडी, पवारवाडी, पिंपरी, जयपूर, कोंबडवाडी व आर्वी या गावांचा समावेश जिहे-काठापूर योजनेत करून पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली. तसेच कराड तालुक्यातील टेंभू, कोरेगाव, सयापूर आणि सदाशिवगड या गावांना टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. या भागातील शेती आणि नागरिकांचे जीवन पाण्याअभावी संकटात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या चर्चेदरम्यान कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांनीही लक्षवेधीला पाठिंबा देत, ज्या टेंभू गावाच्या नावाने उपसा सिंचन योजना ओळखली जाते, त्याच गावाला अद्याप पाणी मिळालेले नाही, ही दुर्दैवी बाब आहे, असे सांगून शासनाचे लक्ष वेधले.
चर्चेनंतर प्रतिक्रिया देताना आमदार मनोज घोरपडे यांनी, आपल्या कार्यकाळात राबविलेल्या विविध सिंचन योजनांचा आढावा दिला. जिहे-काठापूर, नागझरी-उरमोडी, गणेशवाडी उपसा सिंचन, काशीळ-समर्थ गाव योजना, भाटमरळी उपसा सिंचन, पाल-इंदोली योजना, हंबरवाडी-धनगरवाडी टप्पा, तसेच कोपर्डी लिंक कॅनॉल आदी माध्यमांतून कराड उत्तर आणि परिसरातील अनेक गावांपर्यंत पाणी पोहोचविण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. काही योजना पूर्णत्वास गेल्या असून उर्वरित कामे वेगाने सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
टेंभू योजनेअंतर्गत शामगाव, राजाचे कुर्ले, पारगाव, गोरेगाव, पुसेसावळी, पाचूद, कामथी, ढाणेवाडी तसेच म्हासुर्णे परिसरातील गावांसाठीही पाणी आरक्षित करण्यात आले असून, काही गावांना त्याचा लाभ मिळण्यास सुरुवात झाल्याचे त्यांनी नमूद केले. आज सभागृहात ज्या गावांसाठी मागणी केली आहे, त्या गावांनाही पाणी मिळाल्यानंतर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ शंभर टक्के सिंचनाखाली येईल आणि हा भाग कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास आमदार घोरपडे यांनी व्यक्त केला.

