सातारा जिल्हाहोम

विरोधकांना भ्रष्ट कारभाराची शिक्षा भोगावी लागेल – डॉ. सुरेश भोसले

रेठरे बुद्रुक येथे प्रचाराची सांगता, कृष्णाच्या विकासासाठी सिंचन योजनांना गती 

कराड/प्रतिनिधी : – 

साखर कारखान्याचा कसलाही अभ्यास नाही. त्यांना भष्ट्राचाराची पार्श्वभुमी आहे. तरिही मागील निवडणुकीतून काहीही बोध न घेता या निवडणुकीत ते पुन्हा का आलेत, हे समजत नाही. त्यांना त्यांच्या कारभाराची शिक्षा भोगावीच लागेल, असा विश्वास यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचार सांगता सभेत रेठरे बुद्रुक येथे ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, आमदार डॉ. अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, प्रा. धनाजी काटकर, उपाध्यक्ष जगदीश जगताप, मनोहर शिंदे, आदित्य मोहिते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. सुरेश भोसले यांनी, विरोधकांच्या निवडणूक प्रचारावर टीका करताना त्यांच्या घोषणांना वास्तवाचा आधार नसल्याचा आरोप केला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या दराबाबत विरोधकांकडे कोणतीही ठोस भूमिका नसल्याचे सांगत त्यांनी कृष्णा कारखान्याच्या आगामी नियोजनाचा उल्लेख केला. ऊसदर, सभासद कल्याण योजना, बचत आणि विस्तार यांचा समन्वय साधणारे धोरण कारखान्याने निश्चित केले असून पुढील पाच वर्षांत कारखाना राज्यातील आघाडीच्या साखर कारखान्यांमध्ये अधिक भक्कम स्थान निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मागील काळातील कारभारावर टीका करताना त्यांनी काही निर्णयांमुळे कारखान्याचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप केला. कामगारांची देणी, ऊसपुरवठ्याशी संबंधित व्यवहार आणि विस्तारीकरणातील त्रुटी यांचा उल्लेख करत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. गेल्या अकरा वर्षांत कृष्णा कारखान्याच्या कारभारावर विरोधकांना कोणताही ठोस आरोप करता आलेला नाही. पारदर्शक आणि स्वच्छ प्रशासन हीच आमची ताकद असून आमच्या कामावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्याचा दावा त्यांनी केला.

आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही विरोधकांवर जोरदार टीका केली. राज्यातील सर्वाधिक ऊसदर देणाऱ्या कारखान्यांमध्ये कृष्णा कारखान्याचा समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. २०१० ते २०१५ या कालावधीत कारखान्याला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागल्याचे नमूद करत त्यांनी तोडणी व वाहतूक खर्चाची मोठी थकबाकी राहिल्याचा आरोप केला. त्या काळातील आर्थिक निर्णयांमुळे कारखान्याचे नुकसान झाल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आश्वासनांवर टीका करताना त्यांनी त्यामागील आर्थिक गणित स्पष्ट करण्याचे आव्हान दिले. कृष्णा कारखान्याच्या विकासासाठी आणि परिसरातील सिंचन योजनांना गती देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने प्रलंबित सिंचन योजना नव्याने राबविण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विकासाची आणि राजकीय संस्कृतीची परंपरा कायम राखण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

सभेत धोंडिराम जाधव, धैर्यशील मोरे, सचिन नलवडे, महेश खराडे, सुष्मिता जाधव, प्रा. धनाजी काटकर आणि मनोहर शिंदे यांनीही मनोगत व्यक्त करून जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रियांका साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. हणमंतराव सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles