सातारा जिल्हाहोम

भैरवगड ग्रामस्थांचे उपोषण अखेर संपले 

भुस्खलन ग्रस्तांच्या मागण्यांचा होणार फेरविचार; बुधवारी मंत्रालयात पुनर्वसन मंत्र्यांसोबत बैठक निश्चित 

कराड/प्रतिनिधी : – 

गेल्या सात वर्षांपूर्वी अतिवृष्टी मुळे झालेल्या भूस्खलनात बाधित झालेल्या भैरवगड (ता . सातारा) येथील ग्रामस्थांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेले उपोषण अखेर प्रशासनाच्या सकारात्मक आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. ग्रामस्थांच्या मागण्यांचा फेरविचार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या प्रश्नावर येत्या बुधवारी मंत्रालयात पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

भैरवगड येथील भूस्खलनग्रस्त ग्रामस्थांच्या पुनर्वसनासह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी गावातच उपोषणाचे हत्यार उपसले होते. या आंदोलनाची दखल घेत आमदार मनोज घोरपडे यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधितांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीस आमदार मनोज घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य अजित साळुंखे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी पुनर्वसन करताना शासनाने ठरवलेली पाचशे स्क्वेअर फुट जागा व बांधकामासाठी देण्यात येणारी दीड लाख रूपये रक्कम भूस्खलनग्रस्त ग्रामस्थांना अमान्य होती. त्या ऐवजी सातशे स्क्वे. फुट जागा व बांधकामासाठी जास्तीत जास्त रक्कम मिळवुन देण्याच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यापूर्वीच्या निर्णयांचा तसेच प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन मागण्यांचा फेरविचार व रेखांकन करण्याबाबत सकारात्मक भूमिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, या प्रश्नावर आता थेट मंत्रालयात चर्चा होणार असल्याने ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. येत्या बुधवारी पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत भैरवगडच्या पुनर्वसनाचा प्रश्न, भूस्खलनग्रस्तांच्या मागण्या आणि त्यावरील शासनाची पुढील कार्यवाही याबाबत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे. प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण थांबवुन आमदार, जि .प सदस्य व प्रशासनास सहकार्य करत पाठपुरावा चालुच ठेवण्याचा निर्णय उपोषणकर्त्यानी घेतला आहे.

Related Articles