कराडमधील गार्डन गेले चोरीला! – झाकीर पठाण यांचा आरोप
‘माझी वसुंधरा’च्या नावाखाली उद्यान दाखविल्याचा काँग्रेसचा आरोप; चौकशीची मागणी
कराड/प्रतिनिधी : –
कराड पालिकेने ‘माझी वसुंधरा’ अभियानातून बाराडबरी येथे गार्डन उभारल्याचे कागदोपत्री दाखविले; मात्र प्रत्यक्षात तेथे गार्डनच अस्तित्वात नसल्याचा आरोप काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे झाकीर पठाण यांनी केला. ‘कराडमधील गार्डन गेले चोरीला’, अशी उपरोधिक टीका करत त्यांनी या कामाची चौकशी करण्याची मागणी केली.
शासकीय विश्रामगृहात काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. अमित जाधव, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे उपस्थित होते.
बाराडबरी येथील या कामात सुमारे एक कोटी आठ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप पठाण यांनी केला. सीएसआर निधीतून झाडे लावण्यात आली असतील; मात्र ‘माझी वसुंधरा’ अभियानातून स्वतंत्र गार्डन उभारल्याचे दाखविण्यात आले असून, प्रत्यक्षात तेथे गार्डन दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. सोलर पॅनलच्या कामातही गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी फ्लेक्स बोर्डला बंदी असताना माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर नियम बदलण्यात आल्याचा आरोप पठाण यांनी केला. परवानगीपेक्षा मोठे फ्लेक्स लावले जात असून, मुदत संपल्यानंतरही ते कायम राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
फ्लेक्ससाठी पालिकेकडे किती अर्ज आले, याची माहिती मागितली असता अर्जच प्राप्त झाले नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावा त्यांनी केला. नियमबाह्य फ्लेक्सप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करत १५ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. शहरातील मोठ्या होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणीही त्यांनी केली.
पालिका सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतील, तर सर्व प्रकरणांची ईडीमार्फत चौकशी करण्याचा ठराव पालिकेने घ्यावा, असे आव्हान पठाण यांनी दिले. वाढीव भागातील संविधान भवन व उर्दू शाळेच्या प्रस्तावावर आक्षेप घेत, घनकचरा प्रकल्पाजवळ शाळा उभारल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवाद सुरू असून नागरिकांच्या विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आनंदराव लादे यांनी केला. शिवाजी स्टेडियमचे काम सुरू असल्याने खेळाडूंना पर्यायी मैदान नसल्याचे त्यांनी सांगितले.
बैल बाजार रोडची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमुळे अपघात होत असल्याचे अॅड. अमित जाधव यांनी सांगितले. पालिकेने हटविलेली अतिक्रमणे पुन्हा उभी राहत असून, गोरगरिबांवर कारवाई करताना धनदांडग्यांना अभय दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.



