कृष्णा कारखान्यात परिवर्तनासाठी संस्थापक पॅनेलला साथ द्या : पृथ्वीराज चव्हाणांचे सभासदांना आवाहन

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत संस्थापक पॅनेलला पाठिंबा, पृथ्वीराज चव्हाण; सहकार संस्थांचा राजकीय वापर धोकादायक
कराड / प्रतिनिधी : –
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संस्थापक पॅनेलला जाहीर पाठिंबा देत कारखान्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सभासदांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. सहकार संस्थांचा वापर राजकीय वर्चस्व टिकविण्यासाठी आणि विरोधकांना संपविण्यासाठी होऊ लागला असल्याची टीकाही त्यांनी केली.
कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, संस्थापक पॅनेलच्या नेत्या अर्चनाताई मोहिते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, सहकार क्षेत्र हे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचे प्रभावी माध्यम असताना त्याचा वापर सध्या राजकीय हेतूंनी केला जात आहे. सहकारी संस्था, मेडिकल कॉलेज आणि दूध संघ यांच्या आधारे सत्ता टिकविण्याची प्रवृत्ती वाढली असून, हे लोकशाहीसाठी चिंतेचे लक्षण आहे. सहकार आणि राजकारण वेगळे असल्याचा दावा करणारेच आज सहकारी संस्थांचा वापर आर्थिक व राजकीय बळ मिळविण्यासाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कृष्णा कारखान्याच्या कामकाजावर भाष्य करताना त्यांनी ऊस वाहतुकीवरील वाढत्या खर्चाचा मुद्दा उपस्थित केला. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस वेळेत न उचलता बाहेरील लाखो टन ऊस कारखान्यात आणला जात असल्याने वाहतूक खर्च अनावश्यकपणे वाढत असल्याचे ते म्हणाले. हा खर्च नियंत्रणात आणल्यास सभासदांना अधिक चांगला ऊसदर देणे शक्य असल्याचा दावा त्यांनी केला.
संस्थापक पॅनेलने सभासदांसाठी जाहीर केलेल्या १२० किलो साखर, पाणीपट्टी माफी आणि वाढीव ऊसदर यांसारख्या आश्वासनांची अंमलबजावणी व्यवहार्य असल्याचे सांगत त्यांनी कारखाना हा कोणत्याही व्यक्तीच्या मक्तेदारीचा विषय नसून शेतकरी सभासदांच्या हितासाठी चालणारी लोकाभिमुख संस्था असली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
आगामी निवडणुकीत चुकीच्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण आवश्यक असल्याचे नमूद करत चव्हाण म्हणाले, कारखान्यावर निर्माण झालेले दडपशाहीचे वातावरण संपवून संस्था पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीची करण्यासाठी सभासदांनी संस्थापक पॅनेलला पाठिंबा द्यावा.
सभासद नसतानाही प्रश्न विचारण्याचा अधिकार
आपण कृष्णा कारखान्याचे सभासद नसल्याची जाणीव करून देत चव्हाण म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून १९९१ पासून या भागातील जनतेच्या सुख-दुःखात सहभागी आहे. १९९४-९५ च्या सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीतही सभासद नसतानाच सक्रिय भूमिका बजावली होती. त्यामुळे कारखान्यातील कामकाजाबाबत प्रश्न विचारण्याचा आणि जाब मागण्याचा नैतिक अधिकार मला आहे.



