आमदारांच्या गुडबुकमध्ये जाण्यासाठी काहींची धडपड – नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव
पत्रकार परिषदेत विरोधकांवर साधला निशाणा; पालिका सभेतील ११४ विषय एकमताने मंजूर केल्याचा दावा
कराड/प्रतिनिधी : –
कराड शहराच्या विकासासाठी शासन, आमदार अथवा कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत असेल, तर त्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो. मात्र, विकासकामांच्या नावाखाली आमदारांच्या ‘गुडबुक’मध्ये जाण्यासाठी काहीजण धडपडत असल्याचे चित्र दिसत असून, त्यांची कीव येते, अशा शब्दांत यशवंत विकास आघाडीचे नेते तथा कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी यशवंत विकास आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत यादव बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, लोकशाही आघाडीचे जयंत पाटील यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यादव म्हणाले, कराड पालिकेच्या विकासासाठी जो कोणी पुढे येईल, त्याचे आम्ही स्वागतच करू. आमदारांकडून पालिकेच्या कामांसाठी निधी मिळत असेल, तर त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच आहे. मात्र, आमदारांची दिशाभूल करून किंवा त्यांच्या गुडबुकमध्ये जाण्यासाठी राजकारण करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर ते योग्य नाही.
गत पाच वर्षांत कराड शहरातील स्वच्छ सर्वेक्षणाचा बोजवारा उडाला असल्याची टीकाही त्यांनी केली. यासाठी नेमके कोणाला जबाबदार धरायचे, हा संशोधनाचा विषय आहे. शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी पालिकेने ठोस पावले उचलली आहेत. घनकचरा व्यवस्थापनासह गॅसीफाईड प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील कचऱ्याचे ढीग कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. केवळ आजचा विचार न करता पुढील ५० वर्षांचा विचार करून कराड शहराची कचरा व्यवस्थापन व्यवस्था उभी करायची आहे, असे यादव यांनी स्पष्ट केले.
अण्णाभाऊ साठे योजनेतून होणाऱ्या सुमारे चार कोटी रुपयांच्या विकासकामांची टेंडर प्रक्रिया अद्याप बाकी आहे. हा निधी नेमका कोणी अडवला, याचे उत्तर संबंधितांनी द्यावे. भाजपच्या लोकांनीच त्यांची कामे थांबविल्याची स्थिती आहे, असा आरोपही यादव यांनी केला. पालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे १७ ते १८ कोटी रुपयांची रस्त्यांची कामे झाल्याचे सांगून यादव म्हणाले, शहरात गॅस लाईनचे काम सुरू असल्याने या रस्त्यांची पुन्हा खुदाई होणार आहे, याची खंत आहे. मात्र, गॅस लाईनचे काम हे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्याने त्याबाबत पालिकेला मर्यादा आहेत.
पालिका प्रशासन विरोधकांची कामे जाणीवपूर्वक थांबवत असल्याचे आरोप केले जात आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण मासिक सभेत भाजपचे १११ आणि अजेंड्यावरील इतर विषय असे एकूण ११४ विषय एकमताने मंजूर करण्यात आले आहेत. विरोधकांच्या मागण्यांना आणि विकासकामांना आमच्यापेक्षा अधिक प्राधान्य देऊन त्यांच्या विषयांचा अजेंड्यावर समावेश करून ते मंजूर केले आहेत, असा दावा यादव यांनी केला.
पालिकेने स्थापन केलेल्या विविध समित्यांमध्येही विरोधकांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. वृक्ष प्राधिकरण समिती, बाल संरक्षण समिती यांसह विविध समित्यांमध्ये विरोधकांचे प्रत्येकी चार सदस्य घेण्यात आले आहेत. त्यामुळे पालिका विरोधकांना डावलते, असा आरोप करणे योग्य नसल्याचे यादव यांनी सांगितले.
पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सभेत सभागृहाचे पावित्र्य राखले गेले नाही, असा आरोपही यादव यांनी केला. सभागृहाच्या गॅलरीमध्ये बाहेरील कार्यकर्त्यांना का बसविण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सभेच्या कामकाजात गोंधळ निर्माण करून कराड पालिकेच्या सभागृहाच्या इतिहासाला बट्टा लावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर भविष्यात सभागृहातील कामकाज अधिक शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडावे, यासाठी गॅलरी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यादव यांनी स्पष्ट केले.
कराड शहराचा विकास हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा विषय नसून तो संपूर्ण शहराचा प्रश्न आहे. त्यामुळे विकासासाठी निधी आणणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही स्वागत करू; मात्र विकासाच्या नावाखाली राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशाराही यादव यांनी यावेळी दिला.



