कवि विहंगांच्या स्मृतींना रविवारी काव्य-गझल कार्यशाळेत उजाळा

कराड/प्रतिनिधी : –
काव्य आणि गझल लेखनाच्या तांत्रिक बारकाव्यांचा अभ्यास करून नवोदितांना दर्जेदार साहित्यनिर्मितीसाठी मार्गदर्शन मिळावे, तसेच ज्येष्ठ भावकवी स्व. विष्णू केशव देशपांडे (नानासाहेब देशपांडे) उर्फ कवि विहंग यांच्या साहित्यिक कार्याचे स्मरण व्हावे, या उद्देशाने रविवारी (दि. २ ऑगस्ट) कराडात काव्य व गझल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड पुरस्कृत स्व. सौ. वेणूताई चव्हाण स्मृती मराठी साहित्य संघ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा कराड यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा पंताचा कोट येथील कृष्णाबाई मंगल कार्यालय (जुने) येथे दुपारी २ वाजता होणार आहे. कार्यशाळेचे निमंत्रक प्रा. अशोककुमार चव्हाण यांनी ही माहिती दिली.
कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठ, पुणेचे सहकार्यवाह प्राचार्य डॉ. महादेव सगरे राहणार असून श्री कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान सावकार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी संस्थेचे चेअरमन राजन वेळापुरे, कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे आणि संयोजन समितीचे सचिव सुधीर एकांडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
ज्येष्ठ गझलकार व कवयित्री प्रा. सौ. संध्या पाटील या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहभागी होणार आहेत. तर ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रा. डॉ. सुहासकुमार बोबडे कार्यशाळेचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. काव्यरचनेतील आशय, अभिव्यक्ती, वृत्त, लय, अलंकार तसेच गझल लेखनातील तांत्रिक नियम आणि रचनेची शिस्त याबाबत सहभागी साहित्यप्रेमींना मार्गदर्शन केले जाणार आहे.
स्व. विष्णू केशव देशपांडे अर्थात कवि विहंग यांचा जन्म १४ जुलै १९२१ रोजी मरळी, ता. पाटण येथे झाला. त्यांच्या आयुष्याचा मोठा कालखंड कराड येथे व्यतीत झाला. अवघे ४७ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या कवि विहंग यांनी अल्पावधीतच मराठी भावकवितेच्या क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटविला. त्यांच्या काव्यप्रतिभेचा गौरव कुसुमाग्रजांसह अनेक मान्यवर साहित्यिकांनी केला होता.
कवि विहंग हे उत्कृष्ट भावकवी म्हणून परिचित होते. त्यांचा ‘तेजस्विनी’ हा देशभक्तिपर कवितासंग्रह तसेच ‘ललित संगीत’ हा छोटा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांच्या अनेक भावगीतांना १९५० ते १९६० या दशकात आकाशवाणीवरून प्रसारणाची संधी मिळाली आणि ती रसिकांमध्ये लोकप्रियही झाली.
कवि विहंग यांच्या साहित्यिक योगदानाची नव्या पिढीला ओळख करून देणे, त्यांच्या काव्यलेखनाची परंपरा आणि संवेदनशील अभिव्यक्तीचा वारसा पुढे नेणे, तसेच काव्य आणि गझल रचताना आवश्यक असणाऱ्या तांत्रिक बाबींची जाण निर्माण करणे, हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे.
काव्य आणि गझल लेखनाची आवड असणाऱ्या साहित्यप्रेमी, नवोदित कवी-कवयित्री तसेच रसिकांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



