सातारा जिल्हाहोम

शेतकरी-कष्टकऱ्यांच्या हक्कासाठीचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार

शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन कराडमध्ये उत्साहात; युवकांना पक्षकार्यात व्यापक संधी देणार - अॅड. समीर देसाई 

कराड/प्रतिनिधी : – 

शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्षाची परंपरा जपणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचा ७९ वा वर्धापन दिन सातारा जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, कराड येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाची वैचारिक भूमिका आणि संघर्षाची परंपरा पुढे नेत बदलत्या काळानुसार संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. समीर देसाई यांनी, शेतकरी कामगार पक्षाच्या ऐतिहासिक वाटचालीचा आढावा घेतला. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांना सातत्याने आवाज देणारा पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाची ओळख निर्माण झाली आहे. गेल्या ७९ वर्षांत पक्षाने शेतकरी-कष्टकऱ्यांच्या संघर्षाशी आपली नाळ कायम जोडून ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यपूर्व काळातील राजकीय परिस्थिती आणि स्वातंत्र्यानंतरची सत्ता शेतकरी व कामगारांच्या श्रमावर आधारित समाजाच्या हितासाठी वापरली जावी, या विचारातून स्वतंत्र राजकीय संघटनेची गरज निर्माण झाली. त्यातून २ व ३ ऑगस्ट १९४७ रोजी आळंदी येथे शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेची प्रक्रिया झाली. केशवराव जेधे, क्रांतिसिंह नाना पाटील, भाऊसाहेब राऊत आणि शंकरराव मोरे यांसारख्या ज्येष्ठ विचारवंतांच्या सहभागातून पक्षाच्या विचारधारेला आकार मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांशी समरस होऊन त्यांच्या हितासाठी विधायक आणि संघर्षात्मक कार्यक्रम राबविण्याची पक्षाची भूमिका राहिली आहे. हीच वैचारिक परंपरा पुढे नेत नव्या पिढीला पक्षाच्या कार्याशी जोडण्याची आवश्यकता आहे. बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा विचार करून पक्षात युवक-युवतींना अधिकाधिक संधी देण्यात येणार असून, राज्यातील तरुणांनी स्वयंस्फूर्तीने पक्षाच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन अॅड. देसाई यांनी केले.

कार्यक्रमास भाई एम. आर. जाधव, भाई दिनकरराव गुरव आणि कराड पंचायत समिती सदस्य संग्राम पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अॅड. हैबतराव पवार, अॅड. अमित लाड, भाई अरुण डुबल, विद्याधर गायकवाड, संभाजी जाधव, महेश जिरंगे, महेश जमाले, युवराज मस्के, संदीप तिकवडे, प्रल्हाद माने यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles