मलकापूर कन्याशाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश

कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या सन २०२५-२६ च्या अंतिम निकालात श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा, मलकापूरच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. दोन विद्यार्थिनींनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावल्याने विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राहिली आहे.
कुमारी सानवी खराडे हिने २६८ गुण मिळवत शहरी सर्वसाधारण विभागातून जिल्हा गुणवत्ता यादीत ४१ वे स्थान, तर आराध्या जाधव हिने २६२ गुणांसह ६७वे स्थान मिळविले. त्यांच्या या यशामुळे कन्याशाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा जिल्हास्तरावर नोंद झाली आहे. विद्यालयाच्या एकूण सात विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. यामध्ये सानवी खराडे व आराध्या जाधव यांच्यासह शार्वी जाधव, रेवती तडाखे, अश्विनी कटकदौंड, गार्गी जाधव आणि सान्वी संकपाळ यांचा समावेश आहे.
या यशाबद्दल श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात, अध्यक्ष भास्करराव पाटील, उपाध्यक्ष वसंतराव चव्हाण, खजिनदार तुळशीराम शिर्के, मार्गदर्शक संचालिका डॉ. सौ. स्वाती थोरात, संचालक प्रा. संजय थोरात, संचालक पवन पाटील, मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे, पर्यवेक्षिका सौ. करुणा शिर्के, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. विद्यार्थिनींच्या या यशामुळे पालक वर्गातूनही कन्याशाळेच्या शैक्षणिक उपक्रमांचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे कौतुक होत आहे.



