कराडमध्ये गुरुवारी भव्य तिरंगा रॅली
१० हजार नागरिक सहभागी होणार; ३२५ फूट लांब झेंड्याचे आकर्षण

कराड/प्रतिनिधी : –
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तिरंग्याचा आणि देशाच्या सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणाऱ्या शूर जवानांचा सन्मान करण्यासाठी कराडमध्ये गुरुवारी (ता. १३) सकाळी ९ वाजता भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेत सर्व राजकीय पक्ष, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, विविध संघटना, शासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्व स्तरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या निमित्ताने कराडमध्ये आयोजित तिरंगा रॅलीच्या नियोजनासाठी शासकीय विश्रामगृह येथे सर्व शासकीय अधिकाऱ्यांची व्यापक बैठक पार पडली.
या बैठकीत बोलताना आ.डॉ. भोसले म्हणाले, की देशातील नागरिकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना अधिक दृढ करणे, देशप्रेम वाढविणे आणि राष्ट्रीय एकात्मता व ऐक्याची भावना मजबूत करणे, या उद्देशाने ही तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. १३) सकाळी ९ वाजता लाहोटी कन्याशाळा येथून सुरू होणारी ही तिरंगा रॅली चावडी चौक, आझाद चौक मार्गे शिवतीर्थ दत्त चौक येथे पोहोचणार आहे. या रॅलीमध्ये नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन जात, धर्म, पक्षीय विचार आणि सामाजिक भेद बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
बैठकीला प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, कराडचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, मलकापूरचे मुख्याधिकारी कपिल जगताप, पं. स. सभापती नंदाताई यादव, सदस्य दादासाहेब मरगळे, कराडचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर, नगरसेवक शिवाजी पवार, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब जगताप, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचे सहअध्यक्ष प्रमोद पाटील, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. सविता लाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
३२५ फूट लांब झेंड्याचे आकर्षण
या तिरंगा रॅलीत १० हजार नागरिक सहभागी होणार असून, रॅलीसाठी विशेष ३२५ फूट लांब आणि १० फूट रुंदीचा तिरंगा झेंडा मागविण्यात आला आहे. हा भव्य तिरंगा झेंडा रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.



