कोपर्डे हवेली गटातील शाळांचा शैक्षणिक आराखडा
शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध, क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकासावर भर

कराड/प्रतिनिधी : –
विद्यार्थ्यांचे यश केवळ परीक्षेतील गुणांपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या बौद्धिक, क्रीडा, सांस्कृतिक व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी कोपर्डे हवेली गटातील शाळांनी एकत्रित नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध, व्यक्तिमत्त्व विकास आणि विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग व यश वाढविण्यासाठी शाळानिहाय विशेष आराखडा तयार करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद कोपर्डे हवेली गट गुणवत्ता विकास समितीची सहविचार सभा कोपर्डे हवेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत झाली. जिल्हा परिषद सदस्या विद्याताई वेताळ व पंचायत समिती कराड गणाचे सदस्य सिद्धार्थ चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेत शाळांच्या गुणवत्तावाढीबाबत सविस्तर चर्चा झाली.
‘विद्यार्थ्यांचे यश हेच आपले ध्येय असले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्न करावेत,’ असे आवाहन विद्याताई वेताळ यांनी केले. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना संधी देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सभेत गटातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक प्रगतीसह भौतिक सुविधांचा आढावा घेण्यात आला. मुख्याध्यापकांनी शाळेतील शैक्षणिक स्थिती, उपलब्ध सुविधा, आवश्यक बाबी व अडचणी मांडल्या. त्यावर उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. शाळांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याची ग्वाही वेताळ यांनी दिली.
शिष्यवृत्ती परीक्षा, सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा, यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा तसेच स्वर्गीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी शाळानिहाय नियोजन करण्याचे ठरले. गटातील शाळांनी राबविलेले चांगले उपक्रम इतर शाळांपर्यंत पोहोचवून त्यांची देवाण-घेवाण करण्यावरही भर देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन करण्यात आले.
शिक्षणविस्तार अधिकारी रमेश कांबळे व केंद्रप्रमुख मधुसूदन सोनवणे यांच्या नियोजनातून सभा झाली. केंद्रप्रमुख खोराटे, लक्ष्मीकांत जाधव, ज्योती कदम, विषय शिक्षिका निता पाटील, सरपंच प्रकाश खंडागळे, सरपंच शालन पिसाळ, शिक्षण समिती उपाध्यक्ष महादेव चव्हाण, दिनेश घाडगे यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.



