सातारा जिल्हाहोम

कराडच्या सहापदरी उड्डाणपुल अखेर वाहतुकीला खुला 

पहिल्या लेनवरून हलक्या वाहनांची सुरुवात; दुसरी बाजू ३० जूनपर्यंत खुली होणार - मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

कराड/प्रतिनिधी : –

पुणे-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड शहरातील बहुप्रतिक्षित सहापदरी ‘युनिक’ उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन सोमवारी उत्साहात पार पडले. सातारा ते कोल्हापूर दिशेकडील एका लेनवरून हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्यात आली असून, त्यामुळे कराड आणि मलकापूर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. उड्डाणपुलाची दुसरी बाजूही ३० जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुली होणार असून, त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील, भाजप नेते धैर्यशील कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले यांच्यासह विविध मान्यवर व केंद्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री भोसले म्हणाले, शेंद्रे ते कागल या महामार्ग विस्तारीकरण प्रकल्पाचे सुमारे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या कामामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी आणि विविध अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, एवढ्या मोठ्या पायाभूत प्रकल्पा उभारताना काही अडथळे अपरिहार्य असतात. सध्या शेंद्रेपासून सांगली जिल्ह्याच्या हद्दीपर्यंतचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, कोल्हापूर जिल्ह्यातील काही कामे अद्याप सुरू आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एमएसआरडीसी आणि संबंधित यंत्रणा प्रकल्पाचा नियमित आढावा घेत आहेत. उर्वरित कामे दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी संबंधित ठेकेदार व कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नवीन उड्डाणपुलावरून गाडी चालवत स्वतःच गाडीचे स्वारर्थ्य केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही नवीन उड्डाणपुलावरून रॅपेट मारत पुलाची पाहणी केली.

दरम्यान, सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीचा हा आधुनिक सहापदरी उड्डाणपूल महामार्गासह कराड शहरासह वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची वाढती संख्या, शहरातील प्रमुख चौकांवरील वाहतुकीचा ताण आणि वारंवार निर्माण होणारी कोंडी यावर हा प्रकल्प प्रभावी उपाय ठरणार आहे.

उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि बंगळूरूकडे जाणाऱ्या वाहनांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. तसेच कराड व मलकापूर शहरातील अंतर्गत वाहतुकीलाही मोठा दिलासा मिळणार आहे. शहरातील प्रमुख चौकांवरील गर्दीचा ताण कमी होऊन नागरिकांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.

पहिल्या टप्प्यातील वाहतूक सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिक, व्यापारी आणि महामार्गावरील प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेला हा उड्डाणपूल कराडच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरणार असून, महामार्गावरील प्रवासाला नव्या गतीची जोड मिळणार असल्याची भावना नागरिक, वाहनधारक, प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles