सायबर सुरक्षेसाठी कराडचे २० विद्यार्थी ‘सायबर वॉरियर्स’
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमाचा प्रारंभ

कराड/प्रतिनिधी : –
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर डिजिटल सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे क्विक हिल फाउंडेशन आणि महाराष्ट्र सायबर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील २० विद्यार्थ्यांची ‘सायबर वॉरियर्स’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
‘कमवा आणि शिका’ संकल्पनेवर आधारित हे विद्यार्थी शाळा, महाविद्यालये तसेच समाजातील विविध घटकांमध्ये सायबर सुरक्षा, डिजिटल गोपनीयता, डेटा संरक्षण, सुरक्षित इंटरनेट वापर आणि ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव याबाबत जनजागृती करणार आहेत.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी पुणे येथील क्विक हिल फाउंडेशनच्या मुख्यालयात आयोजित ‘सायबर सिम्पोजियम’ प्रशिक्षण पूर्ण केले. ‘माय डेटा, माय रिस्पॉन्सिबिलिटी’ या संकल्पनेवर आधारित प्रशिक्षणात सायबर सुरक्षेतील नवीन आव्हाने, डिजिटल गोपनीयता, डेटा संरक्षण आणि सायबर गुन्ह्यांपासून बचावाच्या उपायांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
क्लब स्थापनेच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ‘सायबर वॉरियर’ पदचिन्हे प्रदान करण्यात आली. यावेळी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचीही निवड झाली. अनिकेत देशमाने अध्यक्ष, आकांक्षा माने सचिव, साक्षी निगडे गतीविधी संचालक, तर तुषार खोचारे यांची मीडिया संचालक म्हणून निवड करण्यात आली.
महाविद्यालयाने मागील वर्षीही हा उपक्रम यशस्वीपणे राबविला होता. त्याबद्दल क्विक हिल फाउंडेशनतर्फे महाविद्यालयाला ‘सर्वोत्कृष्ट सायबर स्मार्ट क्लब’, तर क्लब समन्वयकांना ‘सर्वोत्कृष्ट शिक्षक समन्वयक’ हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
प्राचार्य डॉ. संजीव वाघ म्हणाले, सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता विद्यार्थी आणि नागरिकांनी डिजिटल व्यवहारांमध्ये सजग राहणे ही काळाची गरज आहे. महाविद्यालयाच्या माध्यमातून समाजाच्या विविध स्तरांपर्यंत सायबर सुरक्षिततेचा संदेश पोहोचविला जाईल.
यावेळी उपसंचालक डॉ. एस. के. पाटील, एमसीए विभागप्रमुख प्रा. भागवत पाटील, क्लब समन्वयक प्रा. डॉ. प्रियांका शिंदे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. आळसुंदकर, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. उमेश देशपांडे आदी उपस्थित होते.



