विजयनगरात जागतिक योग दिन उत्साहात
विद्यार्थी, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; योगामुळे मानसिक तणावावर मात करता येते - आनंदराव पाटील

कराड/प्रतिनिधी : –
कराड तालुक्यातील विजयनगर येथील पार्वती मल्टीपर्पज हॉलमध्ये रविवारी जागतिक योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विजयनगर ग्रामपंचायत, विजयनगर शिक्षण प्रसारक मंडळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि इंटरनल फिटनेस स्टुडिओ, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात योगसाधनेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमास कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला.
इंटरनल फिटनेस स्टुडिओचे योग प्रशिक्षक शंतनू कालेकर यांनी विविध योगासने आणि प्राणायामांची प्रात्यक्षिके सादर केली. उपस्थित विद्यार्थी व नागरिकांनाही प्रत्यक्ष योगाभ्यास करून घेत योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व पटवून दिले. योगामुळे मनःशांती, विचारांची स्पष्टता आणि जीवनातील सकारात्मकता वाढते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात बोलताना सदानंद घाटे यांनी, आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणारा मानसिक ताण, नैराश्य आणि अस्थिरता यांवर मात करण्यासाठी योग व ध्यानधारणा प्रभावी साधन असल्याचे नमूद केले. समाजामध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
माजी आमदार आनंदराव पाटील यांनी, योग ही भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे आज संपूर्ण जगात योगाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. विशेषतः तरुणांमधील ताणतणाव, करिअरविषयक संभ्रम आणि मानसिक अस्थिरता कमी करण्यासाठी योगसाधना उपयुक्त ठरते. त्यामुळे प्रत्येकाने नियमित योगाभ्यासाचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, शिक्षण विस्तार अधिकारी जलिना मुलाणी, वसंतराव शिंदे, उद्योजक आर. टी. स्वामी, ॲड. ए. व्ही. पाटील, शिवाजीराव देवकर, सरपंच अनिता संकपाळ, नंदिनी करमळकर, रामभाऊ जाधव, कादर नायकवडी, दिलीप पाटील, विश्वासराव पाटील, प्रतापसिंह पाटील, संजय शीलवंत, नवनाथ यादव, विनोद पाटील, प्रल्हाद संकपाळ, तसेच प्रेमलाकाकी माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच मानसिंग पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास विजयनगरसह पडळी, मुंडे, वारूंजी आणि कराड परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.



