सातारा जिल्हाहोम

‘कृष्णा’साठी सरासरी ८२.२६ टक्के मतदान

सहकार व संस्थापक पॅनेलचे भवितव्य पेटीबंद; १३० गावांत शांततेत मतदान, ३५ हजार ५५७ सभासदांनी बजावला हक्क 

कराड/प्रतिनिधी : – 

रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीसाठी रविवारी (दि. २१) झालेल्या मतदानात सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर मतदान केले. सुमारे सात हजार मयत सभासद वगळता पात्र मतदारांमध्ये सरासरी ८२.२६ टक्के मतदान झाल्याने निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनेल आणि माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ. अर्चनाताई मोहिते यांच्या नेतृत्वाखालील कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेल यांचे राजकीय भवितव्य आता मतपेटीत बंद झाले आहे.

रविवारी सकाळी ८ वाजता मतदान प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली. सातारा जिल्ह्यातील कराड तालुका, तसेच सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव आणि खानापूर या चार तालुक्यांतील १५३ मतदान केंद्रांवर दिवसभर शांततेत मतदान पार पडले.

निवडणुकीसाठी कारखान्याच्या मतदार यादीत ५० हजार २५२ सभासद मतदार नोंदविण्यात आले होते. त्यापैकी सुमारे सात हजार सभासद मयत आहेत. असल्याची नोंद आहे. उर्वरित पात्र मतदारांपैकी ३५ हजार ५५७ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाची टक्केवारी ८२.२६ इतकी झाली.

मात्र, अधिकृत मतदार यादीतील एकूण ५० हजार २५२ मतदारांचा आधार घेतल्यास मतदानाची टक्केवारी ७०.७६ इतकी असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी दिली.

यंदाच्या निवडणुकीत थेट दुरंगी लढत रंगली. मागील निवडणुकीत तिरंगी सामना झाला होता; मात्र यावेळी रयत पॅनेलने सहकार पॅनेलला पाठिंबा दिल्याने सत्ताधारी सहकार पॅनेल आणि विरोधी संस्थापक पॅनेल यांच्यात सरळ मुकाबला पाहायला मिळाला. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीबरोबरच मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दरम्यान, वाठार येथील मतदान केंद्रावर दुपारच्या सुमारास ओळखपत्रावरून क्षणिक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र ती स्पष्टीकरणा नंतर तात्काळ संपुष्टात आली.

आज मतमोजणी, निकालाकडे लक्ष

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज मंगळवारी (दि. २३) रोजी सकाळी ८ वाजल्यापासून कराड येथील वखार महामंडळ गोडाऊन, गेट क्रमांक ६, मार्केट यार्ड येथे करण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली असून, केंद्र परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उच्च मतदानामुळे निकालात चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, कारखान्याच्या पुढील नेतृत्वाचा निर्णय मंगळवारी स्पष्ट होणार आहे.

Related Articles