गतवेळेपेक्षाही अधिक मताधिक्याने विजय मिळेल – डॉ. सुरेश भोसले
कृष्णा कारखाना निवडणुकीत भोसले कुटुंबाचे मतदान, जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या विजयाचा विश्वास

कराड/प्रतिनिधी : –
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या गेल्या पाच वर्षांतील कामकाजाला सभासदांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, कारखान्याच्या प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे सभासदांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत गतवेळेपेक्षाही अधिक मताधिक्याने विजय मिळेल, असा विश्वास कारखान्याचे विद्यमान चेअरमन तथा जयवंतराव भोसले सहकार पॅनलचे नेते डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला.
कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील मतदान केंद्रावर डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले, उत्तराताई भोसले, गौरवीताई भोसले आणि विनायक भोसले यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना डॉ. सुरेश भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ते म्हणाले, कारखान्याच्या माध्यमातून सभासदांच्या हितासाठी सातत्याने काम करण्यात आले आहे. विविध प्रश्नांना प्राधान्याने न्याय देण्याचा प्रयत्न केला असून, त्याचे सकारात्मक परिणाम आज दिसून येत आहेत. या निवडणुकीत मिळणारे मताधिक्य हे सभासदांचा आमच्यावरील वाढता विश्वास अधोरेखित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील निवडणुकीत सहकार पॅनलने २१-० असा एकतर्फी विजय मिळवला होता. यंदाही सभासदांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून, मागील निकालापेक्षाही अधिक भक्कम विजय नोंदविण्याची अपेक्षा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आमदार डॉ. अतुल भोसले कृष्णा कारखान्याचे कार्यक्षेत्र आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित करताना म्हणाले, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील अग्रगण्य साखर कारखान्यांपैकी एक कृष्णा सहकारी साखर कारखाना आहे. सुमारे ५० हजारांहून अधिक सभासद आणि चार तालुक्यांमध्ये विस्तारलेले कार्यक्षेत्र यांमुळे या संस्थेबाबत सभासदांमध्ये विशेष जिव्हाळा आणि विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, कारखान्याचे माजी चेअरमन स्व. यशवंतराव मोहिते, स्व. जयवंतराव भोसले, मदनदादा मोहिते आणि डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या नेतृत्वातून कारखान्याची समृद्ध परंपरा घडली आहे. गेल्या ११ वर्षांपासून डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखाना यशस्वीपणे वाटचाल करत आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील स्थानिक नेतृत्व, कार्यकर्ते आणि शेतकरी सभासद मोठ्या प्रमाणावर सहकार पॅनलच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होऊन योग्य निकाल लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, गौरवीताई भोसले यांनीही पॅनलच्या विजयाबाबत आशावाद व्यक्त केला. सहकार पॅनलचे सर्व उमेदवार चांगले असून, त्यांनी प्रचारादरम्यान थेट शेतकरी सभासदांपर्यंत पोहोचून कारखान्याने केलेल्या कामांची माहिती दिली आहे. तसेच आगामी काळातील विकासाचा आराखडाही त्यांनी सभासदांपुढे प्रभावीपणे मांडला आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षाही चांगला निकाल लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



