Uncategorizedसातारा जिल्हाहोम

मराठी शाळा बंद करण्याचा डाव – शिक्षक आमदार जयंत आसगांवकरांचा आरोप

शिक्षण खात्याच्या मनमानीविरुद्ध शिक्षक संस्थांचा एल्गार, शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाची घोषणा

कराड/प्रतिनिधी : –

राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या विसंगती आणि शिक्षण खात्याच्या मनमानी कारभाराविरोधात शिक्षक संघटना आता आक्रमक झाल्या असून येत्या १५ दिवसांत शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांनी दिला आहे.

सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव येथे बुधवारी (दि. ६) झालेल्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ते म्हणाले की, देशातील अनेक राज्ये शिक्षण क्षेत्रात प्रगती करत असताना महाराष्ट्र मात्र मागे पडत आहे. यासाठी राज्यातील शिक्षण खातेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी बोलताना आसगांवकर म्हणाले, मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद, शासकीय व अनुदानित शाळा बंद करण्याचा संगनमताने प्रयत्न सुरू आहे. ग्रामीण व निमशहरी भागातील अनेक शाळा बंद पडत असून, त्याचा सर्वाधिक फटका वाडी-वस्तीवरील विद्यार्थ्यांना बसत आहे. दुसरीकडे, कोणत्याही ठोस आराखड्याशिवाय इंग्रजी माध्यमाच्या व स्वयंअर्थसहाय्यित शाळांना परवानग्या दिल्या जात असल्याने शिक्षण व्यवस्थेत असमतोल निर्माण झाला आहे.

अनुदानित शाळांसाठी आवश्यक असलेल्या इमारत, खेळाचे मैदान, स्वच्छतागृहे किंवा प्रशिक्षित शिक्षकांच्या अटी नव्या शाळांवर लागू केल्या जात नाहीत. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत असून पालकांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला. आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

या अधिवेशनात नागपूरचे रवींद्र फडणवीस यांनीही शिक्षण विभागावर टीका करताना सांगितले की, राज्य सरकारकडून कायद्याच्या विरोधात परिपत्रके काढली जात आहेत. शिक्षक भरतीसंदर्भातील ‘पवित्र पोर्टल’ प्रणालीबाबत विधिमंडळात विधेयक मंजूर झालेले नसतानाही सरकार अंमलबजावणी करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोकराव थोरात होते. त्यांनी जिल्हा पातळीवर संघटना अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. यावेळी एस.टी. सुकरे यांनी वार्षिक अहवाल सादर केला, तर स्वागताध्यक्ष किसनराव जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक डि. के. जाधव (कोयना एज्युकेशन सोसायटी, तळदेव) यांनी केले.

अधिवेशनाला पुण्याचे आप्पासाहेब बालवडकर, परभणीचे माजी आमदार विजय गव्हाणे, सांगलीचे रावसाहेब पाटील, शिक्षणतज्ज्ञ सचिन नलावडे, चंद्रकांत जाधव यांसह सातारा जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles