सातारा जिल्हाहोम

तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात ११ मे रोजी आंदोलन

'पाणी हक्क वाचवा'चा नारा; बाधित व लाभक्षेत्रातील ग्रामस्थांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

कराड/प्रतिनिधी : – 

तारळी धरण परिसरात प्रस्तावित अदानी पंप स्टोरेज हायड्रो प्रकल्पाविरोधात आता संघर्ष तीव्र होत असून, येत्या सोमवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता धरण परिसरात मोठ्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अदानी-तारळी पंप स्टोरेज प्रकल्प विरोधी कृती समितीच्या वतीने हा लढा उभारला जात असून, बाधित व लाभक्षेत्रातील गावांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले आहे.

समितीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, तारळी धरण हे राज्याच्या महसुलातून उभारण्यात आले असून, पाणलोट क्षेत्रातील नागरिकांचे पुनर्वसन याच भागात झाले आहे. मात्र, मूळ आराखड्यानुसार लाभधारकांना आजही पूर्णपणे पाणी मिळालेले नाही. अशा परिस्थितीत नवीन पंप स्टोरेज प्रकल्प उभारण्याचा निर्णय हा स्थानिकांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकल्पामुळे धरणातील पाणी साठ्यावर तसेच सिंचन व्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पाटण, कराड, खटाव आणि माण तालुक्यातील दुष्काळी भागांना मिळणारे पिण्याचे व शेतीचे पाणी धोक्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. अनेक गावांना अजूनही नियोजित पाणीपुरवठा मिळालेला नसताना, या प्रकल्पासाठी पाणी वळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे.

याशिवाय, बोगद्यांच्या कामासाठी होणाऱ्या स्फोटांमुळे धरणाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, भूस्खलन, शेतीचे नुकसान आणि पर्यावरणीय हानीचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. वन्यजीवांच्या अधिवासावरही याचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

स्थानिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता प्रकल्प राबवला जात आहे. त्यामुळे हा प्रकल्प तत्काळ रद्द करावा, अशी मागणी करत समितीने जनतेला आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles