सातारा जिल्हाहोम

संस्कारांसह कृषी शिक्षणातून घडवूया उत्तम नागरिक – डॉ. शशिकांत तरंगे

कृषि महाविद्यालयात प्रक्षेत्र, प्रयोगशाळा व विद्यार्थ्यांच्या सुविधांची पाहणी

कराड/प्रतिनिधी : –

ज्ञानासोबत उत्तम संस्कारांची शिदोरी देऊन जबाबदार नागरिक आणि चांगली व्यक्तिमत्त्वे घडविण्याचे काम कृषी महाविद्यालयातून झाले पाहिजे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. शशिकांत तरंगे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण शासकीय कृषि महाविद्यालय, कराड येथे मंगळवारी (दि. ११) प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी डॉ. तरंगे यांनी महाविद्यालयातील विविध प्रयोगशाळा, विद्यार्थी वसतिगृहे, परीक्षा केंद्र, कृषि संशोधन केंद्र, तसेच विविध प्रक्षेत्रांची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत आवश्यक मार्गदर्शनही केले.टेंभू प्रक्षेत्राच्या भेटीदरम्यान बिजोत्पादन, प्रायोगिक व प्रात्यक्षिक प्रक्षेत्रातील कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. सैदापूर प्रक्षेत्रातील ऊस व भात बिजोत्पादन प्रकल्पाची पाहणी करून आंब्याच्या मातृवृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी जमिन समतलीकरण, सिंचन सुविधा, सैदापूर प्रक्षेत्रासाठी स्वतंत्र वीज जोडणी, क्रीडांगण, शेतकरी प्रशिक्षण सभागृह, अद्ययावत प्रयोगशाळा, नवीन इमारत आणि मिनी बस यांसह विविध विकासकामांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना डॉ. तरंगे यांनी दिल्या. विद्यार्थ्यांचे प्रश्न, तसेच विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन देत, हक्काचा माणूस म्हणून कधीही माझ्याशी संपर्क साधा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. संग्राम धुमाळ यांनी, महाविद्यालयाच्या शैक्षणिक, प्रशासकीय, संशोधन, विस्तार व पायाभूत सुविधांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अर्चना ताठे यांनी केले, तर आभार विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. कैलास काळे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालय व कृषि संशोधन केंद्रातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles