रोटरी क्लब ऑफ कराडचा सेवाकार्यात झेंडा
१७ पुरस्कारांची कमाई; १०४ क्लबमधून सर्वोत्कृष्ट अध्यक्ष, सचिवाचा बहुमान; आरोग्य, बालकल्याण, पर्यावरणासह विविध उपक्रमांची दखल

कराड/प्रतिनिधी : –
समाजसेवेच्या विविध क्षेत्रांत वर्षभर प्रभावी कामगिरी बजावत रोटरी क्लब ऑफ कराडने रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ मध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. रोटरी वर्ष २०२५–२६ मधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्लबला तब्बल १७ पुरस्कारांनी गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील १०४ रोटरी क्लबमधून क्लबचे अध्यक्ष डॉ. शेखर कोगनुळकर यांना सर्वोत्कृष्ट अध्यक्ष, तर विनायक राउत यांना सर्वोत्कृष्ट सचिव पुरस्कार मिळाला.
लातूर येथे ९ ऑगस्ट रोजी झालेल्या रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ अचिव्हर्स २०२५–२६ पुरस्कार सोहळ्यात हा गौरव करण्यात आला. क्लबला क्लब एक्सलन्स अवॉर्ड, डीजी सिटेशन, आरोग्यविषयक उत्कृष्ट प्रकल्प, बाल आरोग्य सेवा प्रकल्प, ‘सेव्ह गर्ल चाइल्ड’ उपक्रम, वक्तृत्व स्पर्धा आणि उत्कृष्ट जनसंपर्क अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट वैद्यकीय प्रकल्पासाठी क्लबला रोख पुरस्कारही मिळाला. क्लबच्या विस्तार आणि सामाजिक सहभागाचीही जिल्हास्तरावर दखल घेण्यात आली.
रोटरी क्लब दक्षिण मांड कराड या नवीन क्लबची स्थापना, नवीन रोटरॅक्ट क्लबची निर्मिती, ग्लोबल ग्रँट प्रकल्प आणि कोल्हापूर मेडिकल मिशनमधील उल्लेखनीय सहभागाबद्दल क्लबला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रबोध पुरोहित यांना सर्वोत्कृष्ट रोटरी जिल्हा अधिकारी पुरस्कार मिळाला. राहुल फासे आणि डॉ. शेखर कोगनुळकर यांना काश्मीर व कोल्हापूर मेडिकल मिशनमधील योगदानाबद्दल विशेष गौरव करण्यात आला.
रुग्णसेवेला अत्याधुनिक उपकरणांची साथरोटरी क्लब ऑफ कराडने सामाजिक उपक्रमांबरोबरच आरोग्य क्षेत्रातही भरीव काम केले आहे. क्लबच्या ६८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच ग्लोबल ग्रँटच्या माध्यमातून कराड उपजिल्हा रुग्णालयासाठी सुमारे ३४ लाख रुपयांच्या अत्याधुनिक नेत्रचिकित्सा उपकरणांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये फेको मशीन, ऑपरेटिंग मायक्रोस्कोप तसेच डोळ्यांची तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आवश्यक आधुनिक उपकरणांचा समावेश आहे. याशिवाय राजमाची निसर्ग उद्यानात सुमारे तीन लाख रुपये खर्चून गॅझेबो व वॉकिंग ट्रॅकची निर्मिती करण्यात येत आहे. आरोग्य शिबिरे, रक्तदान, बाल व महिला आरोग्य उपक्रम, रस्ता सुरक्षा जनजागृती, जलसंवर्धन, वृक्षारोपण, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, सदस्यवाढ आणि जनसंपर्क अशा विविध क्षेत्रांत वर्षभर क्लबने सातत्याने उपक्रम राबविले.
या यशाबद्दल अध्यक्ष डॉ. शेखर कोगनुळकर यांनी, हे यश कोणत्याही एका व्यक्तीचे नसून रोटरी क्लब ऑफ कराडच्या प्रत्येक सदस्याचे, पदाधिकाऱ्यांचे, जिल्हा नेतृत्वाचे, कुटुंबीयांचे आणि हितचिंतकांच्या सहकार्याचे फलित असल्याचे सांगितले.



