कराड उत्तरमध्ये भाजपाच्या विजयाचार आनंदोत्सव
पाच राज्यांतील यशानंतर ओगलेवाडीत जल्लोष; सूर्यकांत पडवळ यांच्या जिल्हाध्यक्षपदी निवडीचा सत्कार

कराड/प्रतिनिधी : –
देशातील पाच राज्यांच्या नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या यशाचा विजयोत्सव ओगलेवाडी येथील जनसंपर्क कार्यालयासमोर उत्साहात साजरा करण्यात आला.
पश्चिम बंगाल, आसाम आणि पदुच्चेरी या राज्यांमध्ये भाजपाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट उसळली होती. यानिमित्ताने कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. मिठाईचे वाटप करून एकमेकांना शुभेच्छा देत विजयाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
या कार्यक्रमात एक महत्त्वाचा क्षण म्हणजे सूर्यकांत पडवळ यांची सातारा जिल्हा भाजपा किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शंकरराव शेजवळ, बाळासाहेब शिंदे, बाळासो पवार, चंद्रकांत मदने, सुरेश कुंभार, विकास गायकवाड, जवाहर पवार, बाळासाहेब पोळ, रुक्मिणी जाधव, उषा नलवडे, नम्रता कुलकर्णी, अश्विनी पळसे, विश्वास सावंत, रामराव भोसले, युवराज चव्हाण, जयसिंग डांगे, राजाराम काटवटे, भीमराव पाटोळे, विनोद डुबल, दिनेश घाडगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी कार्यकर्त्यांनी एकमेकांना गळाभेट देत विजयाचा आनंद व्यक्त केला आणि भविष्यातही अशाच यशासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.



