सातारा जिल्हाहोम

जनकल्याण पतसंस्था बारामतीकरांच्या सेवेत दाखल 

२५ जूनला नवीन शाखेचा शुभारंभ; १००० कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल - चंद्रशेखर देशपांडे

कराड/प्रतिनिधी : – 

कराडची जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था आता बारामतीकरांच्या सेवेत दाखल होत असून, संस्था १००० कोटी रुपयांच्या एकत्रित व्यवसायाच्या दिशेने वाटचाल करत आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे यांनी दिली. बारामती शाखेचा शुभारंभ गुरुवार, २५ जून रोजी सकाळी १०.३० वाजता विश्व एम्पायर, भिगवण रोड येथे होणार आहे.

सभासदांच्या विश्वासाच्या बळावर संस्थेने ५९९ कोटी २५ लाख रुपयांच्या ठेवी, ३६१ कोटी ७७ लाख रुपयांचे कर्जवाटप करत ९६१ कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय गाठला आहे. ३२७ कोटी रुपयांची गुंतवणूक आणि केवळ १.८७ टक्के नक्त एनपीए राखत संस्थेने आर्थिक स्थैर्य सिद्ध केले आहे.

संस्थेकडून युपीआय, आरटीजीएस, एनईएफटी, फास्टॅग, क्यूआर कोड व्यवहार, प्रीपेड डेबिट कार्ड तसेच विविध विमा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना व्याजदरात सवलतही दिली जाते.

संस्थेच्या आर्थिक प्रगतीची दखल घेत नॅफकॅबने संभाव्य बँकिंगक्षम पतसंस्थांच्या यादीत जनकल्याणचा समावेश केला आहे. महाराष्ट्र शासनाने बारामतीसह कोथरूड, गडहिंग्लज व तासगाव येथे नवीन शाखांना मंजुरी दिली आहे. बारामती शाखेच्या माध्यमातून संस्थेच्या विस्ताराला नवी गती मिळणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles