सातारा जिल्हाहोम

आनंदराव चव्हाण विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात

कराड/प्रतिनिधी : – 

नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी मलकापूर येथील श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आनंदराव चव्हाण विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. पारंपरिक संस्कृतीची झलक आणि शैक्षणिक उपक्रमांचा संगम साधत आयोजित करण्यात आलेल्या प्रवेशोत्सवाने विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिलाच दिवस अविस्मरणीय ठरला.

शाळेच्या परिसरात लेझीम, झांज पथक आणि ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांची स्वागत मिरवणूक काढण्यात आली. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संचलनामुळे कार्यक्रमात विशेष आकर्षण निर्माण झाले. शाळेच्या प्रवेशद्वारापासून नवागत विद्यार्थ्यांवर फुलांची उधळण करण्यात आली. रांगोळ्या, फुगे आणि आकर्षक स्वागत कमानींनी सजविलेल्या परिसरामुळे उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना वही आणि पेन भेट देण्यात आले. तसेच शासनाकडून उपलब्ध मोफत पाठ्यपुस्तकांचेही वाटप करण्यात आले. नवीन पुस्तके हातात मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकत होते. विद्यार्थ्यांना गोड खाऊ देऊन त्यांच्या स्वागताचा आनंद अधिक द्विगुणित करण्यात आला.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. पी. फराळे यांनी शाळेच्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय वाटचालीची माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शिक्षणासोबतच सर्वांगीण विकासासाठी विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.

या प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, संचालिका डॉ. स्वाती थोरात, उपमुख्याध्यापक जे. बी. पाटील, पर्यवेक्षिका एस. आर. भोरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles