कृष्णा कारखान्यात नेहमी सभासद हिताचा कारभार – डॉ. सुरेश भोसले
विंग येथे शेतकरी सभासद संवाद मेळावा व कार्यअहवाल पुस्तिका

कराड/प्रतिनिधी : –
सभासदांचा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. प्रामाणिकपणे काम केले तरच सहकार टिकतो, हे सूत्र समोर ठेवून आम्ही कृष्णा कारखान्यात नेहमी सभासद हिताचा कारभार केला, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
विंग (ता. कराड) येथे आयोजित शेतकरी सभासद संवाद मेळावा आणि कार्यअहवाल पुस्तिका प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
कृष्णा कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात ऐतिहासिक १४.१९ लाख मेट्रीक टन गाळप केल्याबद्दल आणि सभासदांना उच्चांकी ३५०० रुपयांचे ऊस बिल दिल्याबद्दल विंग परिसरातील सभासदांच्यावतीने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानपत्र प्रदान करुन डॉ. भोसले यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आमदार आनंदराव पाटील, कराड पं. स. सभापती नंदाताई यादव, जि.प. सदस्या शैलजा शिंदे, प्रियांका साळुंखे, कराड पं. स. सदस्य पैलवान धनंजय पाटील, ॲड. नरेंद्र नांगरे-पाटील, अर्जुन कराळे, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्या रेखाताई पवार, कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, धोंडीराम जाधव, दत्तात्रय देसाई, संजय पाटील, निवासराव थोरात, शिवाजी पाटील, जितेंद्र पाटील, विलास भंडारे, दीपक पाटील, जे. डी. मोरे, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, बबनराव शिंदे, श्रीरंग देसाई, सयाजी यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की सभासदांना मोफत साखर देणारा आपला एकमेव कारखाना आहे. कारखान्याचे विस्तारीकरण करताना, आम्ही ऊसदरामध्ये कधीही तडजोड केली नाही. तसेच याचा सभासदांवर कोणताही अतिरिक्त भार पडू दिला नाही. सहकारामुळेच या भागाची खरी प्रगती झाली आहे. एकरी १०० टन ऊस उत्पादन घेण्यात आपण यशस्वी झालो आहोत. येत्या काळात ए.आय. तंत्रज्ञान व ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करुन अनेक क्षेत्रांमध्ये सहज १०० टनांपेक्षा अधिक ऊस उत्पादन घेता येणार असून, यासाठी कारखाना शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकारी करेल.
काटकसरीने कारखाना चालवणे हेच आमचे सूत्र राहिले आहे. सर्वाधिक एफआरपी आणि तीही सर्वात लवकर देणारा कारखाना म्हणून आपण ओळख निर्माण केली आहे. गेल्या ११ वर्षांतील यशस्वी कामगिरीची नोंद व्ही.एस.आय.सह इतर संस्थांनी घेत कृष्णा कारखान्याचा राज्य व राष्ट्रीय पातळीवर गौरव केला असल्याचे त्यांनी सांगितले.
आ. डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावरच डॉ. सुरेशबाबांच्या नेतृत्वाखाली कृष्णा कारखान्यात आधुनिकीकरणासह अनेक ठोस कामे करता आली. यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याने १४.१९ लाख टन ऊस गाळपाचा ऐतिहासिक उच्चांक गाठला. शेतकऱ्यांना प्रतिटन सुमारे ३५०० रुपये ऊसबिल वेळेत देण्यात आले. त्यामुळे सभासदांचा कारखान्यावरचा विश्वास अधिक ठाम झाला आहे. महाराष्ट्रातील क्रमांक एकचा साखर कारखाना म्हणून कृष्णेची ओळख अधिक भक्कम करण्यासाठी सर्वांनी सहकार पॅनलच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या सांगली जिल्हाध्यक्ष सुश्मिता जाधव यांनी सहकारात स्थिरता असणे अत्यंत आवश्यक असून, ही स्थिरता देण्याचे काम डॉ. सुरेशबाबा भोसले यांच्या नेतृत्वातून झाले आहे. सहकार टिकविण्यासाठी आणि अधिक सक्षमपणे वाढविण्यासाठी सभासदांनी सहकार पॅनलला साथ द्यावी, असे आवाहन केले.
संचालक श्रीरंग देसाई यांनी डॉ. सुरेशबाबांच्या नेतृत्वात कृष्णा कारखाना सहकार क्षेत्रात देशातील क्रमांक एकचा कारखाना बनेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी जि. प. सदस्य शंकरराव खबाले यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला बहे गावचे उपसरपंच मनोज पाटील, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक गिरीश पाटील, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक माणिकराव पाटील-घोणशीकर, माजी जि. प. सदस्य शंकरराव खबाले, राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या सांगली जिल्हाध्यक्ष सुश्मिता जाधव, पैलवान आनंदराव मोहिते, आर. टी. स्वामी, सचिन पाचपुते, हेमंत पाटील यांच्याशह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संचालक बबनराव शिंदे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. रामभाऊ सातपुते सूत्रसंचालन केले. हेमंत पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. सचिन पाचपुते यांनी आभार मानले.
‘कृष्णा सहकाराचा गोड आदर्श’चे प्रकाशन
जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या गेल्या ११ वर्षांतील गौरवशाली कार्यकाळाचा आढावा घेणाऱ्या ‘कृष्णा सहकाराचा गोड आदर्श’ या कार्यअहवाल पुस्तिकेच्या प्रकाशन ज्येष्ठ सभासद शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या ११ वर्षांत जयवंतराव भोसले सहकार पॅनलने कृष्णा कारखान्यात केलेल्या विकासकामांचा, आधुनिकीकरणाचा, शेतकरी हिताच्या योजनांचा आणि सहकार क्षेत्रातील यशस्वी वाटचालीचा सविस्तर आढावा या पुस्तिकेत मांडण्यात आला आहे.



