रामकृष्ण वेताळ यांची कोल्हापूर पूर्व जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती
कराड/प्रतिनिधी : –
भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण श्रीमंत वेताळ यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा मोठा विश्वास दाखवत कोल्हापूर पूर्व अर्थात हातकणंगले मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांची या मतदारसंघासाठी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्व क्षमतेची ही मोठी दखल मानली जात आहे.
पक्ष बांधणीतील त्यांची हातोटी, संघटन कौशल्य, तसेच झोकून देऊन काम करण्याची त्यांची कार्यपद्धती यामुळेच त्यांची या महत्त्वाच्या पदावर निवड करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून ते भाजपमध्ये सक्रिय असून, पक्ष वाढीसाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. कार्यकर्त्यांशी असलेला जवळचा संपर्क, विविध स्तरांवर संघटन मजबूत करण्यासाठी घेतलेले उपक्रम आणि पक्षनिष्ठा यामुळे त्यांचे नाव पक्ष नेतृत्वाच्या विश्वासार्ह यादीत अग्रस्थानी राहिले आहे.
गेल्या महिन्यातच त्यांची भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर अल्पावधीतच त्यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून पक्ष नेतृत्व त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवत असल्याचे स्पष्ट होते. विशेषतः हातकणंगले मतदारसंघात पक्ष वाढीसाठी त्यांना मोठे प्रयत्न करावे लागणार असून, त्यासाठी त्यांनी आधीच नियोजन सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
रामकृष्ण श्रीमंत वेताळ यांचे संघटन कौशल्य, युवकांमध्ये असलेली लोकप्रियता आणि नवीन नेतृत्व घडवण्याची क्षमता ही त्यांची सर्वात मोठी ताकद मानली जाते. ग्रामीण भागात, वाढीव वस्तीमध्ये तसेच नव्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून संघटन मजबूत करण्याची त्यांची शैली वेगळी आहे. त्यामुळेच पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
या पदावर काम करताना त्यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने पक्ष वाढीसाठी अथक प्रयत्न केले आहेत, त्याच जोमाने ते हातकणंगले मतदारसंघातही काम करतील, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघात भाजपाचा झंझावात निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. पक्षातील वरिष्ठ नेते, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक घटकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या असून, या नव्या जबाबदारीत ते यशस्वी ठरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
रामकृष्ण श्रीमंत वेताळ यांच्यावर सोपवण्यात आलेली ही जबाबदारी केवळ पदनियुक्ती नसून, त्यांच्या कार्यक्षमतेची आणि नेतृत्वगुणांची मिळालेली मोठी पावती आहे. आता त्यांच्या कामगिरीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



