पिंपरी-चिंचवड भाजपच्या प्रभारीपदी भरत पाटील यांची निवड

कराड/प्रतिनिधी : –
भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवड शहरातील संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वाचा निर्णय घेत ॲड. भरत पाटील यांची प्रभारीपदी नियुक्ती जाहीर केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही घोषणा केली असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
भरत पाटील हे गेल्या तीन दशकांपासून भारतीय जनता पक्षाशी निष्ठेने जोडलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली असून त्यांचा संघटन कौशल्यावर विश्वास व्यक्त केला जात आहे.
सध्या पाटील हे भारत सरकारच्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी गुजरात, राजस्थान, गोवा आणि दिल्ली येथील विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाने त्यांच्यावर प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली होती. त्या काळात त्यांनी प्रभावी नियोजन आणि कार्यकर्त्यांशी समन्वय साधत जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या.
त्यांच्या या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर आता पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या शहराची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. आगामी काळात स्थानिक पातळीवर पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन काम करण्यावर भर देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
सर्वांना सोबत घेऊन संघटन वाढविणे आणि पक्षाची ताकद अधिक भक्कम करणे, हेच प्राधान्य असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



