२६ एप्रिलला यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळा
कराड/प्रतिनिधी : –
येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ वितरण सोहळा रविवारी (दि. २६) स्व. सौ. वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात सायं. ४.३० वाजता संपन्न होणार आहे.
यंदाच्या पुरस्कारासाठी समाजकार्य, वैद्यकीय सेवा, साहित्य आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. गरजू, वंचित आणि वृद्धाश्रमातील नागरिकांसाठी दीर्घकाळ सेवा देणाऱ्या सौ. भाग्यश्री अभय कुलकर्णी-प्रभुणे (धुळे) यांना सन २०२३-२४ साठीचा सामाजिक कार्यासाठी ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच प्रशासकीय सेवेत कार्यरत राहून सामाजिक जाणिवा जपणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. विश्वास पाटील यांना सन २०२४-२५ साठीचा ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाणार आहे.
त्याचबरोबर आदिवासी व वंचित भागात गेली २३ वर्षे कार्यरत असलेल्या डॉ. अंजली अतुल शाह यांचा सन २०२४-२५ साठीचा ‘स्व. सौ. वेणूताई चव्हाण महिला शक्ती गौरव पुरस्कार’ देऊन विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यपाल श्रीतिवास पाटील उपस्थित राहणार असून, माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील अध्यक्षस्थानी असतील. आमदार डॉ. अतुल भोसले, शिवम प्रतिष्ठानचे मार्गदर्शक इंद्रजित देशमुख, तसेच ज्येष्ठ पत्रकार डॉ. रवींद्र बेडकीहळ आणि साहित्यिक विनोद कुलकर्णी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार), चेअरमन राजन वेळापुरे, कार्यालाक्षी संचालक विवेक वेळापुरे, समन्वयक प्रा. अशोकराव चव्हाण केले आहे.



