अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सह्याद्री कारखान्यावर ऊसतोडणी व वाहतूक करारांना सुरुवात

23 हजार हेक्टर ऊस गाळपाचे नियोजन
कराड/प्रतिनिधी : –
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने सन 2026-27 च्या गळीत हंगामासाठी भक्कम तयारीला सुरुवात केली असून अक्षय्य तृतीया या शुभ मुहूर्तावर ऊसतोडणी व वाहतूक करारांची अधिकृत सुरुवात करण्यात आली. कारखान्याचे चेअरमन तथा राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते या प्रक्रियेचा शुभारंभ झाला.
मागील 2025-26 हंगामात कारखान्याने दैनंदिन गाळप क्षमतेत लक्षणीय वाढ करत 7,500 मेट्रिक टनांवरून 11,000 मेट्रिक टनांचा विस्तार प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित केला आहे. या वाढीव क्षमतेनुसार येत्या हंगामासाठी आवश्यक ऊसतोडणी व वाहतूक व्यवस्था उभारण्यावर विशेष भर दिला जात आहे.
कारखान्याकडे यंदा सुमारे 23,000 हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली असून, संपूर्ण ऊस वेळेत गाळपासाठी व्यापक नियोजन करण्यात येत आहे. यासाठी बैलगाड्या, ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रक तसेच आधुनिक ऊसतोडणी यंत्रणा यांच्याशी करार प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत तोडणी व वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असून, गळीत हंगाम सुरळीत पार पडण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमास कार्यकारी संचालक विश्वजित शिंदे, शेती अधिकारी वसंतराव चव्हाण, नितीन साळुंखे, संजय चव्हाण, वाहनमालक संग्राम भोसले, मंगेश पाटील, नितीन कदम, बाळासो बजबळे, जयवंत घाडगे, तसेच मशीन मालक व ऊसतोडणी कंत्राटदारांसह अनेक सभासद व कर्मचारी उपस्थित होते.



