खासदार-आमदार वाढीऐवजी विद्यमान जागांमध्येच ५० टक्के महिला आरक्षण द्या – अशोकराव थोरात

कराड/प्रतिनिधी : –
देशातील लोकप्रतिनिधींची संख्या वाढवण्याच्या प्रस्तावाला विरोध करत, विद्यमान जागांमध्येच महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव थोरात यांनी केली आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली खासदार व आमदारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दिल्लीत सुरू असलेल्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अशोकराव थोरात, लोकसभेतील खासदारांची संख्या 543 वरून 853 पर्यंत वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर देशातील आमदारसंख्येतही सुमारे दोन हजारांची भर पडू शकते. या वाढीमुळे दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार जनतेवर पडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
थोरात यांनी मांडलेल्या आकडेवारीनुसार, एका खासदारावर वार्षिक सुमारे 4 कोटींपेक्षा अधिक खर्च होतो. त्यामुळे वाढीव खासदारसंख्येमुळे हजारो कोटी रुपयांचा खर्च वाढेल. याशिवाय निवास, प्रवास, वैद्यकीय सुविधा, सुरक्षा आणि पेन्शनसारख्या सुविधांवरही मोठ्या प्रमाणात खर्च होणार असल्याची त्यांनी नोंद घेतली.
ते म्हणाले, सध्या अनेक लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल असून मोठ्या प्रमाणात ते आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. अशा परिस्थितीत संख्या वाढवण्याऐवजी गुणवत्तापूर्ण, अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्नांवर काम करणारे प्रतिनिधी निवडले जाणे अधिक महत्त्वाचे आहे.
देशात शिक्षण, आरोग्य, शेती, पाणीपुरवठा आणि बेरोजगारी यांसारखे गंभीर प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची गरज असताना लोकप्रतिनिधींची संख्या वाढवणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. आधुनिक तंत्रज्ञान, ऑनलाइन प्रणाली आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमुळे प्रशासन व जनसंपर्क अधिक प्रभावीपणे करता येऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
डिलिमिटेशन प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 2011 नंतर जनगणना झालेली नसताना मतदारसंघ पुनर्रचना करणे योग्य ठरणार नाही. 2027 नंतर होणाऱ्या जनगणनेनंतरच याबाबत निर्णय घ्यावा, अशी त्यांची भूमिका आहे. अन्यथा देशात प्रादेशिक असमतोल निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्रपणे जागा वाढवण्याऐवजी सध्याच्या खासदार व आमदार संख्येमध्येच 50 टक्के आरक्षण देऊन सक्षम महिलांना संधी देणे अधिक परिणामकारक ठरेल, असे थोरात यांनी सांगितले.



