सातारा जिल्हाहोम

मातृभाषेतून शिक्षणच यशाचा पाया – अॅड. उदयसिंह पाटील

उंडाळे शाळेत संगणक लॅबचे उद्घाटन, ग्रामपंचायतीच्या निधीतून हायटेक सुविधांचा लाभ

कराड/प्रतिनिधी : –

मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मराठी माध्यमाची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत अॅड. उदयसिंह पाटील यांनी व्यक्त केले.

उंडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगातून उभारण्यात आलेल्या संगणक लॅब कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

पाटील म्हणाले, मातृभाषेतून घेतलेले शिक्षण विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेला चालना देत त्यांना ध्येय निश्चितीकडे नेते. मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळे कोणताही न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही. अनेक यशस्वी व्यक्तींनी मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. इंग्रजी भाषेचे वाढते महत्त्व मान्य करतानाच त्यांनी विद्यार्थ्यांनी संगणक लॅबचा योग्य वापर करून मराठीसह इतर भाषांवर प्रभुत्व मिळवावे, असा सल्ला दिला. जिल्हा परिषद शाळांमध्येही आधुनिक सुविधा उपलब्ध होत असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांना अशा शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विस्तार अधिकारी नितीन जगताप यांनीही मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी ग्रामस्थ व पालकांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. ग्रामीण भागात पटसंख्या घटल्याने काही शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून शाळा अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य नितीन थोरात, सदस्या वृषाली पाटील, सरपंच संगीता माळी, केंद्रप्रमुख धनश्री जगताप, माजी विस्तार अधिकारी अरुण पाटील, मुख्याध्यापिका नंदा मोरे, ग्रामसेवक शरद चव्हाण, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सुहास पाटील यांनी मानले.

Related Articles