सातारा जिल्हाहोम

कृष्णा कारखाना सक्षम बनविण्यासाठी सहकार पॅनेलच्या पाठीशी उभे राहा – डॉ. सुरेश भोसले

वाठारला सहकार पॅनेलची प्रचार सभा, पाणीपट्टीचा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्नशील – आ. अतुल भोसले

कराड/प्रतिनिधी : – 

गेल्या अकरा वर्षांत पारदर्शक प्रशासन, शेतकरीहिताचे निर्णय आणि विकासाभिमुख धोरणांच्या बळावर सभासदांचा विश्वास संपादन करण्यात यश मिळाले असून, कारखान्याला अधिक सक्षम आणि प्रगत बनविण्यासाठी शेतकरी सभासदांनी सहकार पॅनेलच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. आम्ही निश्चितपणे कारखान्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ वाठार, ता. कराड येथे आयोजित प्रचार सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन मदनदादा मोहिते, व्हा. चेअरमन जगदीश जगताप, उमेदवार दत्तात्रय देसाई यांच्यासह अन्य उमेदवार व मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सुरेश भोसले यांनी, कारखान्याने राबविलेल्या विविध योजनांचा आढावा घेत कारखान्याच्या पाणीपुरवठा योजनांमुळे हजारो सभासद शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ऊस उत्पादनात मोठी वाढ झाली असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नातही भर पडल्याचे सांगितले. तसेच वाढत्या ऊस क्षेत्राचा विचार करून कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात आली असून, आगामी काळात तब्बल १५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तसेच सभासद शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा अधिक दर मिळावा, यासाठी व्यवस्थापन सातत्याने प्रयत्नशील राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी बोलताना आमदार डॉ. अतुल भोसले यांनी, कारखान्याच्या नेतृत्वाने दिलेल्या आश्वासनांची आणि केलेल्या कामांची आठवण करून दिली. २०१५ च्या निवडणुकीत सभासदांना ६० किलो मोफत साखर घरपोहोच देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. काही कारणांमुळे घरपोहोच सेवा देता आली नसली, तरी गावपातळीपर्यंत साखरेची पोती पोहोचविण्याचे काम प्रामाणिकपणे करण्यात आले असल्याचे सांगितले.

ते म्हणाले, केंद्र सरकारच्या एआयबीपी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अपूर्ण आणि रखडलेल्या सहकारी सिंचन प्रकल्पांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यामुळे अनेक प्रकल्पांची कामे जलदगतीने पूर्ण होणार आहेत. परिणामी सिंचनक्षमता वाढून अधिक क्षेत्र ओलिताखाली येईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल. कृष्णा कारखान्याच्या पाणीपुरवठा योजनेलाही या माध्यमातून आर्थिक बळ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. विशेषतः योजनेवरील वीजबिलाचा आर्थिक भार कमी करून शेतकऱ्यांवरील पाणीपट्टीचा खर्च घटविण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

उमेदवार दत्तात्रय देसाई यांनी, आपल्या मनोगतात गेल्या दशकभरात कृष्णा कारखान्यात झालेल्या बदलांचा आणि विकासकामांचा आढावा घेतला. डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने आर्थिक स्थैर्य, औद्योगिक विस्तार आणि शेतकरी कल्याण या तीनही क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली असल्याचे त्यांनी नमूद केले. कारखान्याच्या विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी आणि सभासदांच्या हिताच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित सभासदांना केले.

याप्रसंगी मान्यवरांनी विरोधकांच्या प्रचारातील आरोपांच्या मुद्यांचे खंडन करून कारखान्याच्या भावी विकासाचा आराखडा मांडला. सभेस वाठार व परिसरातील कारखान्याचे सभासद, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles