सातारा जिल्हाहोम

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तरमध्ये रक्तदान, मोतीबिंदू शिबिर 

शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात फवारणी पंपांचे वाटप

कराड/प्रतिनिधी : –

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. आमदार मनोज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमांमध्ये रहिमतपूर येथे रक्तदान शिबिर, उंब्रज येथे मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर, तर मसूर येथे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात औषध फवारणी पंपांचे वाटप करण्यात आले.

रहिमतपूर येथे पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा तथा भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने-कदम यांच्या पुढाकाराने आयोजित रक्तदान शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो युवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

उंब्रज येथे एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, पुणे यांच्या सहकार्याने मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा शेकडो ग्रामस्थांनी लाभ घेतला. मसूर येथे आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात औषध फवारणी पंपांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमांना सातारा-सांगली विधानपरिषद सदस्य आ. धैर्यशील कदम, खटाव-माण साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे, रहिमतपूरच्या नगराध्यक्षा वैशाली माने, निलेश माने, मंडल अध्यक्ष रणजित माने, एन. ए. राऊत, जयंत माने यांच्यासह नगरसेवक, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना संग्राम घोरपडे म्हणाले, सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे, या तत्त्वावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यरत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य, शेती आणि समाजसेवेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.’ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles