सातारा जिल्हाहोम

‘नीट’ पेपरफुटीविरोधात कराडात युवकांचे आंदोलन 

तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय ठिय्या; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी 

कराड/प्रतिनिधी : –

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी व गैरव्यवहाराच्या निषेधार्थ, तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी कराडातील महाविद्यालयीन युवक-युवती आणि सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय ठिय्या आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, पेपरफुटीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान ‘विद्यार्थ्यांना न्याय द्या’, ‘पेपरफुटी थांबवा’, ‘शिक्षण व्यवस्थेचे राजकारण बंद करा’, ‘शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’, ‘इंकलाब जिंदाबाद’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

दरम्यान, आंदोलनस्थळी एका आंदोलकाने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या गाजलेल्या संवादाचा संदर्भ घेत ‘आपण कुणालाच घाबरत नाही’ असा संदेश असलेले पोस्टर आणले होते. हे पोस्टर आंदोलनस्थळी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होते.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी तहसील कार्यालय परिसरात कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, त्यामुळे आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल आंदोलक युवक-युवतींनी कराड पोलिसांचे अभिनंदन केले.

कराडातील वकिलांनीही आंदोलनस्थळी उपस्थित राहून युवक-युवतींच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. वकिलांच्या वतीने आंदोलकांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कायदेशीर व सामाजिक पातळीवर सहकार्य करण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related Articles