सातारा जिल्हाहोम

कोपर्डे हवेली श्री स्वामी समर्थ सेवा दरबारात श्री गुरुपौर्णिमा उत्सव

बुधवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

कराड/प्रतिनिधी : –

कोपर्डे हवेली, ता. कराड येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा दरबारात बुधवार, दि. 29 रोजी श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित), गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच कोपर्डे हवेली सेवा दरबाराच्या वतीने हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाची सुरुवात सकाळी 8 वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भूपाळी व आरतीने होईल. त्यानंतर भाविकांना गुरुपद देण्यास प्रारंभ होईल. तसेच 11 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप व हवनयुक्त सेवा पार पडेल. सकाळी 10.30 वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची महानेवैद्य आरती, तसेच श्री स्वामी चरित्र सारामृत हवनयुक्त सेवा होणार आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध आध्यात्मिक प्रश्नोत्तर सेवा, वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता गुरुपौर्णिमेनिमित्त सामुदायिक श्री दुर्गा सप्तशती हवनयुक्त पाठवाचन सेवा आयोजित करण्यात आली आहे.

यानंतर सायंकाळी 5 वाजता पालखी सोहळा व औदुंबर प्रदक्षिणा, तर सायंकाळी 6 वाजता महानेवैद्य आरती, मार्गदर्शन व कार्यक्रमाची सांगता होणार आहे. परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येक भाविक व सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुपद घेण्यासाठी कोपर्डे हवेली सेवा केंद्रात उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles