सातारा जिल्हाहोम

विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ कराडात वंचितचा एल्गार

‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; तहसील कार्यालयावर मोर्चा

कराड/प्रतिनिधी : – 

‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी न्याय मिळावा, या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी कराडात जोरदार निषेध मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देत हा मोर्चा काढण्यात आला. बुधवारपेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास सुरुवात झाली. कॉटेज हॉस्पिटल, कृष्णा नाका, कन्याशाळा, चावडी चौक, मुख्य बाजारपेठ मार्गे मोर्चा दत्त चौकात पोहोचला. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी तहसील प्रशासनास मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांवरील लाठीमाराची सखोल चौकशी करावी, जखमी विद्यार्थ्यांना मदत द्यावी, विद्यार्थ्यांशी सकारात्मक संवाद साधावा तसेच विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मोर्चात समता सामाजिक विकास संस्थेचे आनंदराव लादे, फाउंडेशनचे जावेद नायकवडी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करीत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने पाहून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Related Articles