पालकर शाळेतील चिमुकल्यांची वारकरी दिंडी उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –
आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने कै. सौ. अनुसया काशिनाथ पालकर आदर्श शिशु विहार, कराड येथे शुक्रवार दि. 24 जुलै रोजी विद्यार्थ्यांची पारंपरिक वारकरी दिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. टाळ-मृदंगाचा निनाद, हरिनामाचा गजर आणि वारकरी वेशातील चिमुकल्यांमुळे परिसर भक्तिमय झाला होता.
दिंडीपूर्वी पालखीचे पूजन संस्थेचे सहसचिव खोचीकर सर आणि संचालक कालवडेकर सर यांच्या हस्ते करण्यात आले. या दिंडीत बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक तसेच इंग्लिश मीडियम विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
वारकरी दिंडीत चि. सार्थक कोळेकर यांनी भगवान विठ्ठल, तर कु. रितिका खापरे यांनी रुक्मिणीची भूमिका साकारली. याशिवाय निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, संत सखुबाई, संत तुकाराम, संत नामदेव, संत गोरा कुंभार आणि संत जनाबाई यांच्यासह वारकऱ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी साकारलेल्या भूमिका विशेष आकर्षण ठरल्या.
शाळेच्या प्रांगणातून निघालेली ही दिंडी श्री गणपती मंदिर, चावडी चौक मार्गे विठ्ठल चौकात पोहोचली. ‘जय जय विठोबा रखुमाई’ आणि हरिनामाच्या गजरात दिंडीचे श्री मारुती बुवांच्या मठात आगमन झाले.
संस्थेचे अध्यक्ष आनंदराव पालकर, सचिव सुरेखा पालकर, उपाध्यक्ष जयंतराव पालकर, विठ्ठलराव शिखरे, सहसचिव खोचीकर सर, संचालक शेवाळे सर, कालवडेकर सर, चंद्रशेखर खेडेकर, मोहन वराडकर, अनंतप्रसाद पावसकर, दीपक टकले सर तसेच संचालिका वैशाली पालकर, राजश्री पालकर आणि संगीता पालकर यांच्या हस्ते पालखीचे स्वागत व पूजन करण्यात आले.
या धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.



