शेतकरी संघटना अविनाश मोहितेंच्या पाठीशी – रघुनाथदादा पाटील
साखराळेत कोपरा सभा उत्साहात; विरोधकांकडे कर्तृत्व नसल्यानेच आमच्या आश्वासनांवर टीका - अविनाश मोहिते

ईश्वरपूर/प्रतिनिधी : –
यशवंतराव चव्हाण कृष्णा सहकारी साखर कारखान्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात सभासदांमध्ये तीव्र नाराजी असून, आगामी निवडणुकीत परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे. शेतकरी संघटना अविनाश मोहिते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, संस्थापक पॅनेल कारखान्यात पुन्हा सत्तांतर घडवेल, असा विश्वास शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केला.
कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साखराळे (ता. वाळवा) येथे कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेलच्या प्रचारार्थ आयोजित सभासद गाठीभेट व कोपरा सभा उत्साहात पार पडली. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी अविनाश मोहिते यांना जाहीर पाठिंबा दिला.
सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अविनाश पाटील होते. यावेळी माजी चेअरमन अविनाशदादा मोहिते, शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष शंकरराव मोहिते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष एकनाथ निकम-पाटील, नितीन खरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रघुनाथदादा म्हणाले, स्व. यशवंतराव मोहिते यांनी कृष्णा कारखान्याचे आदर्श व्यवस्थापन केले. त्या काळापासून शेतकरी संघटना मोहिते परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. अविनाश मोहिते यांनाही पाठिंबा दिल्यावर तेही चेअरमन झाले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना उच्चांकी ऊसदर, पाणी पाळ्या, विविध सुविधा आणि सन्मान मिळाला. त्यामुळे या निवडणुकीतही संघटना त्यांना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एफआरपी सर्व कारखान्यांना समान असताना सत्ताधाऱ्यांवर वेगळे काय केले, असा त्यांनी सवाल उपस्थित केला. पाणी योजनांमुळे जलसाठा वाढल्याचे सांगत विहिरींवरील ऊस क्षेत्रावरही पाणीपट्टी आकारल्याने सभासदांमध्ये त्यांच्यावर रोष असल्याचे त्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांशी हुकूमशाही पद्धतीने वागणूक दिली जात असल्याचा दावा करत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सभासदांनी अविनाश मोहितेंना साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
माजी चेअरमन अविनाश मोहिते म्हणाले, २०१० मध्ये सभासदांनी संस्थापक पॅनेलला सत्ता दिल्यानंतर सर्वसामान्य सभासद केंद्रस्थानी ठेवून काम केले. वेळेत ऊसतोड, वाढीव पाणी पाळ्या आणि एफआरपी व्यतिरिक्त ३४१ कोटी रुपयांचा अतिरिक्त ऊसदर देण्यात आला. विरोधकांनी मात्र गेल्या दहा वर्षांत एफआरपीपलीकडे एक रुपयाही जादा दिलेला नाही, असा आरोप त्यांनी केला.
आम्ही पाणीपुरवठा योजनांद्वारे शेतकऱ्यांना आठ तासांऐवजी सोळा तास पाणी उपलब्ध करून दिले, कृषी प्रदर्शने, आठ हजार मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया यांसारख्या उपक्रमांचा उल्लेख त्यांनी केला. भविष्यातही सभासदहिताचे निर्णय घेतले जातील, असे सांगितले. कारखान्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी ९७७ कोटी रुपयांच्या कर्जाचा उल्लेख केला. वारसांच्या नावावर हजारो शेअर्स हस्तांतरित न झाल्याचा आरोप करत, ऊस उत्पादनाशी संबंध नसलेल्या व्यक्तींनाही शेअर्स देण्यात आल्याचा दावा केला.
आपल्या अपंगत्वाची थट्टा केली जात असल्याची खंत व्यक्त करत मोहिते म्हणाले, सत्ताधाऱ्यांकडे सभासदांना दाखवण्यासारखे कर्तृत्व नसल्यानेच आमच्या आश्वासनांवर टीका सुरू आहे. आम्ही दिलेल्या १२० किलो मोफत साखर आणि एकरी ७५०० रुपये पाणीपट्टी या घोषणा अभ्यासपूर्वकच करण्यात आल्या आहेत. कारखाना खाजगीकरणाच्या दिशेने जाऊ नये, यासाठी परिवर्तन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात बालाजी जगताप यांनी, अविनाश मोहिते यांच्या कार्यकाळातील १२.६० लाख टन ऊस गाळपाच्या विक्रमाचा उल्लेख केला. गजानन पाटील यांनी संस्थापक पॅनेलच्या कारभाराचा आढावा घेत विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले.
यावेळी अतुल पाटील, महादेव पवार, शंकरराव मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व स्वागत एकनाथ निकम-पाटील यांनी, तर आभार विकास सुतार यांनी मानले. सभेला विठ्ठल नाईक, सयाजी पाटील, सुभाष पाटील यांच्यासह साखराळे व परिसरातील शेतकरी सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


