सेवानिवृत्तीनिमित्त संजय निंबाळकरांचा गौरव
सैदापुरात आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते सत्कार
कराड/प्रतिनिधी : –
ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना लोकांच्या समस्या तत्परतेने सोडवत गावाच्या विकासात मोलाचे योगदान देणारे संजय निंबाळकर यांचा सैदापूर येथे सेवानिवृत्तीनिमित्त गौरव करण्यात आला. आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते झालेल्या या सत्कार सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी निंबाळकर यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी बोलताना आमदार घोरपडे म्हणाले, ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील दुवा म्हणून ग्रामविकास अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. लोकांच्या अडीअडचणी समजून घेत त्या सोडविण्याची कार्यपद्धती संजय निंबाळकर यांनी आपल्या सेवाकाळात जपली. त्यामुळे त्यांनी प्रशासनात एक आदर्श निर्माण केला असून अशा लोकाभिमुख अधिकाऱ्यांची आज गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
माजी आमदार आनंदराव पाटील यांनी, सैदापूरच्या वाढत्या लोकसंख्येचा उल्लेख करत गावासमोरील नागरी सुविधांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. सुमारे ४० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या सैदापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे नगरपंचायतीच्या मागणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, विजय विभूते, निवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. उबाळे, महसूल अधिकारी युवराज पाटील, माजी गटविकास अधिकारी देशमुख, हिंदकेसरी संतोष वेताळ, रामकृष्ण वेताळ, प्रकाश पाटील, शंकरराव खापे, प्रदीप पाटील, निवासराव थोरात, प्रवीण जाधव, रणजित जाधव, नगरसेविका नीलम कदम, भीमराव डांगे, सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच अनिल जाधव, मोहनराव जाधव, मानसिंग जाधव, एस. आर. मुल्ला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना संजय निंबाळकर यांनी, आपल्या सेवाकाळातील अनुभव मांडत ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी जयराज व वैष्णवी निंबाळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मोहनराव जाधव यांनी प्रास्ताविक, तर विजय माने यांनी सूत्रसंचालन केले.


