सातारा जिल्हाहोम

चहाच्या कपातून उभा राहिला जनसंवाद 

आमदार घोरपडेंचा ‘स्पॉट ऑफिस’ चर्चेत; अतित एस.टी. कँटीनमध्ये दीड तास नागरिकांच्या समस्या ऐकून तात्काळ दिले निर्देश

कराड/प्रतिनिधी : – 

अतित येथे पार पडलेल्या सावडण्यांच्या कार्यक्रमानंतर घडलेला एक साधा प्रसंग सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. कार्यक्रम आटोपल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आमदार मनोजदादा घोरपडे यांनी चहासाठी अतित येथील एस.टी. बसस्थानकावरील कँटीनमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निव्वळ ‘चहाचा ब्रेक’ ठरला नाही, तर तो थेट जनसंवादाचा खुला दरबार ठरला.

आमदार कँटीनमध्ये आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावातील नागरिक, कार्यकर्ते आणि प्रवासी मोठ्या संख्येने तेथे जमा झाले. पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, तसेच विविध वैयक्तिक अडचणी अशा अनेक प्रश्नांसह नागरिकांनी आमदारांपुढे आपली मते मांडली.

विशेष म्हणजे, आमदार घोरपडे यांनी कोणताही औपचारिकतेचा बोजा न ठेवता प्रत्येकाची समस्या शांतपणे ऐकून घेतली. अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधत आवश्यक सूचना दिल्या. सुरुवातीला काही मिनिटांसाठी थांबलेले आमदार तब्बल दीड तास कँटीनमध्ये बसून नागरिकांच्या समस्या सोडवण्यात गुंतले होते.

या अनपेक्षित जनसंवादामुळे कँटीन परिसरात वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. येणारे-जाणारे प्रवासीही थांबून हा प्रसंग पाहत होते आणि आमदारांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत होते.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव पाटील, सिनेअभिनेते समृद्धी जाधव, उद्धव यादव, सुधीर जाधव, संभाजी यादव यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

मी कुटुंबासह पुण्यावरून कोल्हापूरकडे जात असताना चहा-नाश्त्यासाठी अतित बसस्थानकात थांबलो होतो. त्यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे हे कँटीनमध्ये बसून नागरिकांची कामे करत असल्याचे पाहिले. त्यांच्या आपुलकीच्या वागणुकीने समाधान वाटले.

– हणमंत चावरे (प्रवासी)

Related Articles