सातारा जिल्हाहोम

शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त धावले माजी विद्यार्थी व मॅरेथॉनपटू

कराड/प्रतिनिधी : –

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेवाडीच्या १५१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘रन फॉर एज्युकेशन’ अर्थात कोळेवाडी मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत २५० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवून शाळेविषयीचे प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त केला.

स्पर्धेचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू कृष्णात गोसावी सेठ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवडी, माजी उपसभापती रमेश देशमुख, कोळे पोलीस दुरुक्षेत्राचे अधिकारी भिलारी साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी संभाजीराव कानवटे, केंद्रप्रमुख आनंदा धायगुडे, माजी सरपंच वसंतराव भोसले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटील व मुख्याध्यापक भारती लोकरे यांच्या उपस्थितीत ध्वज फडकवून करण्यात आला.

शाळेने ४ मे रोजी १५१ वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. सातारा, पाटण, कराड, कोरेगाव व फलटण तालुक्यातून स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेतला. विशेष म्हणजे महिला स्पर्धकांची लक्षणीय उपस्थिती लक्षवेधी ठरली. १० ते ६५ वर्षे वयोगटातील स्पर्धकांसाठी तीन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. लहान गटासाठी २ किलोमीटर तर मोठ्या गटासाठी ५ किलोमीटर अंतर निश्चित करण्यात आले होते.

या उपक्रमामुळे शाळेने शिक्षणासोबतच आरोग्य आणि क्रीडा संस्कृतीचा संदेश दिला. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये लहान गटात अथर्व नलवडे पुरुषांच्या गटात अभिराज जाधव तर महिलांच्या खुल्या गटात समृद्धी माने हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.स्पर्धेतील विजेत्यांना कृष्णात गोसावी सेठ यांच्या हस्ते पदक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्वतः गोसावी सेठ व शिक्षणाधिकारी नायकवडी यांनीही स्पर्धेत सहभाग घेत स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत कोळेवाडी, माजी विद्यार्थी संघ, शाळा व्यवस्थापन समिती सर्व गणेश उत्सव व दुर्गादेवी उत्सव तरुण मंडळ, ढोल पथक मंडळ कोळेवाडी आणि शिंदेवाडी व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कोरडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद गायकवाड यांनी केले.

६५ वर्षीय माजी विद्यार्थी राजेंद्र जाधव आकर्षण

या स्पर्धेतील विशेष आकर्षण ठरले ते ६५ वर्षीय माजी विद्यार्थी राजेंद्र जाधव माऊली यांचे. तरुणांनाही लाजवेल अशा जोशात त्यांनी ५ किलोमीटर अंतर पूर्ण करत उपस्थितांची दाद मिळवली. त्यांच्या कामगिरीतून शाळेतील विद्यार्थ्यांची सर्वांगीण जडणघडण अधोरेखित झाली. कोळेवाडी शाळेचे विद्यार्थी बौद्धिक सामाजिक आर्थिक व शारीरिक दुसऱ्याही तंदुरुस्त आहेत हे त्यांनी दाखवून दिले.

Related Articles